- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : पालक फी भरू न शकल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबविण्यात आल्याचा आरोप मालाडमधील एका शाळेवर पालकांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच मदत मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे शुल्क न भरल्यास शिक्षकांचे पगार द्यायचे कुठून, असा सवाल शाळेने उपस्थित केला आहे.मालाड पूर्वच्या कुरार परिसरात ज्योत्स्ना धीरजलाल तलकचंद इंग्रजी शाळेमध्ये इयत्ता आठवी व नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क न भरल्याने जानेवारीपासून ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची पोलिसांच्या मध्यस्थीने भेट घेण्यात आली. मात्र तरीही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे नंतर शिक्षण अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र, त्यानंतरही शाळेकडून सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे आता काही हजारांसाठी मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याचा आरोप संजय बोऱ्हाडे या पालकांनी केला. बोऱ्हाडे यांची मुलगी इयत्ता नववीत शिकत असून ४ जानेवारी, २०२१ पासून त्यांच्या मुलीला ऑनलाइन शिक्षणाची लिंकच पाठवली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच शुल्क न भरल्याने अशाच प्रकारे आणखी ५० विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागले, असा आराेप करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार देणार कसे?ज्योत्स्ना धीरजलाल तलकचंद इंग्रजी शाळेत घडलेल्या या प्रकाराबद्दल डीटीएसएस कॉलेज ऑफ लाॅचे मुख्याध्यापक मुरलीधर कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळेला कोणतेही अनुदान मिळत नाही. कोरोना काळात आम्ही शाळेची फी कमी केली आहे. तसेच पालकांना ती चार हप्त्यांमध्ये भरता येईल, अशी सुविधाही दिली आहे. तरीदेखील पालकांनी शुल्क भरलेले नाही. त्यामुळे शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही कसे द्यायचे, हा प्रश्न आमच्यासमोर असून कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
शुल्क न भरल्याने शाळेने थांबवले ऑनलाइन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 2:10 AM