मुंबई : गोरेगाव पूर्वच्या यशोधाम शाळेत नवव्या वर्गात शिकणाऱ्या शार्दुल आरोलकर (१४) नामक विद्यार्थ्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी हा दुर्दैवी प्रकार घडला.
शार्दुलचे वडील संजय हे दिंडोशी कोर्टात नोकरीला आहेत. ते बोरिवली पश्चिम येथील योगीनगरमध्ये शासकीय वसाहतीत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्नी स्नेहलता यांनी फोन करत शार्दुलला लाइफलाइन रुग्णालयात नेत असल्याचे कळवले. संजय यांनी रुग्णालयात धाव घेतली तेव्हा शार्दुल बेशुद्ध अवस्थेत होता. काही वेळाने डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार शार्दुलला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
झाले काय?शार्दुल ट्रेनरसोबत पोहत असताना अचानक बुडाला. मुख्य ट्रेनर सागर यांनी त्याला लगेचच बाहेर काढले. तिथे शार्दुलला उलटी झाली. मात्र, त्यानंतर तो बेशुद्ध पडला. स्नेहलता यांनी ट्रेनरच्या मदतीने शार्दुलला रुग्णालयात हलवले. याप्रकरणी संजय यांनी शाळेचे ट्रस्टी, व्यवस्थापन आणि ट्रेनरच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शार्दुलचा गेल्या सहा महिन्यांपासून बेसिक स्विमिंगचा कोर्स सुरू होता. हे सर्व यशोधाम शाळेच्या अंतर्गत चालविले जात होते. शार्दुल हा स्पेशल चाइल्ड असून, या घटनेप्रकरणी आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी सांगितले.