Join us

अनलॉकमध्येही शाळा राहणार लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:07 AM

आजपासून सुरू होणार नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन, कोरोनाच्या काळातील निर्बंध शिथिल मात्र शाळा बंदचलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

आजपासून सुरू होणार नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन, कोरोनाच्या काळातील निर्बंध शिथिल मात्र शाळा बंदच

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, असले तरी शाळा आणि शैक्षणिक संस्था तूर्तास बंदच राहतील. दहावीच्या मूल्यांकनासाठी आणि आवश्यकता असल्यास प्रशासकीय कामांसाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलावण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात शिकवणीसाठी शाळा लॉकच असणार आहेत. त्यामुळे साेमवारपासून (दिनांक १५ जून) विद्यार्थी शिक्षकांसाठी शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही ऑनलाइन प्रवेशोत्सवाने होईल.

मुंबई विभागातील सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा आजपासून ऑनलाइन सुरू होणार आहेत. यासाठी शिक्षकांना सध्या तरी घरातूनच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवावे लागतील. दहावीच्या निकालाच्या मूल्यांकनासाठी काही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र शाळेत बोलावले जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि शाळा समन्वय समितीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. तूर्तास तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष शिक्षणासाठी बंदच राहणार आहेत. शाळा सुरू करण्याआधीही स्थानिक प्रशासनाकडून शाळांना, व्यवस्थापनांना त्या सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील. त्याप्रमाणे, शाळांनी निर्जंतुकीकरण, स्वच्छता अशी तयारी करून मगच शाळा उघडण्याची कार्यवाही करण्यात येईल.

* शाळा सुरू करायची म्हटली तर...

मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. अनेक ठिकाणी तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शाळांचे कोविड विलगीकरण कक्षातही रूपांतर करण्यात आले होते. त्यामुळे शाळांना निर्जंतुकीकरण, साफसफाईसाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो. शाळेची डागडुजी, निर्जंतुकीकरण, साफसफाई व अन्य सुविधांसाठी काही हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो. यासाठी निधी कोण पुरविणार, हा प्रश्न काही अनुदानित मराठी शाळांसाठी अनुत्तरित आहे.

* गुरूजींची शाळा सुरू होणार

कोरोनाच्या काळात शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्या, तरी प्रशासकीय कामासाठी सुरू आहेत. यंदाही १५ जूनपासून वरिष्ठांच्या सूचनेनुसार कोरोना लसीकरण, शिक्षण विभागाचे प्रशासकीय कामकाज व दहावीच्या निकालाचे मूल्यांकन यासाठी शाळांमध्ये शिक्षकांना बोलावण्यात येत आहे. त्यामुळे शाळा शिकविण्यासाठी लॉक असल्या, तरी शिक्षकांचे अध्यापनाचे काम आणि शाळांचे प्रशासकीय काम यासाठी शाळा सुरू असतील.

* सूचनांनुसार पुढील निर्देश

सध्यातरी शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू करण्याच्या सूचना आहेत. भविष्यात शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल किंवा तशा सूचना येतील. त्याप्रमाणे, आम्ही शाळांनाही त्याप्रमाणे निर्देश देणार आहोत.

- संदीप संगवे, उपसंचालक, मुंबई विभाग

चौकट

एकूण विद्यार्थी संख्या -

मुले - मुली - एकूण

पालिका - ३,७८,३००-३,४९,०२५- ७,२७,३२५

डिव्हायडी - ६,५६,०३५-५,८५,६९७-१२,४१,७३२

..........................................................