लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात रविवारी एका ३० वर्षीय व्यक्तीने १७ वर्षीय मैत्रिणीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत ही मुलगी ६० टक्के भाजली असून रुग्णालयात सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
पीडित मुलगी ही दहावीत शिकणारी विद्यार्थिनी असून ती अंधेरी पूर्वेकडील रहिवासी आहे. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपीही याच परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून दोघे वारंवार भेटून एकत्र वेळ घालवत होते.
स्थानिकांनी त्यांना अनेकवेळा पकडले आणि मुलीच्या पालकांना कळवले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी तिला समज देत तिचे आरोपीला भेटणे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याच रागाच्या भरात आरोपीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पेट्रोल सोबत घेऊन आलेला
आरोपी २ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित मुलीच्या घराबाहेर आला. त्याने तिला बाहेर बोलावले. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने सोबत आणलेल्या बाटलीतले पेट्रोल तिच्यावर टाकत आग लावली. यावेळी स्थानिकांनी मुलीला वाचविण्यात यश मिळवले. आगीत आरोपीचे हातदेखील भाजले. पालकांनी यावेळी पोलिसांना पाचारण करत मुलीला कूपर रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर आहे.