मनीषा म्हात्रे मुंबई : मैत्रिणीसोबत खासगी शिकवणीला जात असलेल्या नेहरूनगरातील मुलीची छेड काढत भररस्त्यात रोडरोमियोंकडून झालेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच मानखुर्दमध्येही असाच एक संतापजनक प्रकार बुधवारी घडला. शाळेत जाताना तीन रोडरोमिओंकडून सुरू असलेल्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने शाळेत सोडण्यासाठी भावाला सोबत नेल्याच्या रागातून या रोडरोमियोंनी मुलीच्या भावावर शाळेबाहेर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर परिसरात १६ वर्षांची नेहा (नावात बदल) आईवडील आणि १८ वर्षांच्या भावासोबत राहते. याच परिसरातील शाळेत ती शिक्षण घेत आहे. नेहमी मैत्रिणींसोबत ती शाळेत जात असे. गेल्या दहा दिवसांपासून शाळेत जाण्याच्या मार्गावर उभे राहून तीन तरुण त्यांची छेड काढत होते. भररस्त्यातच त्यांना अडवून अश्लील शेरेबाजी, टिंगलटवाळी या रोडरोमियोंकडून सुरू होती. सुरुवातीला नेहासह अन्य मुलींनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच रोडरोमियोंना बळ मिळाले. मुलींचे हात पकडून त्यांना सोबत ये, म्हणण्यापर्यंत या रोडरोमियोंची मजल गेली.शाळेत जाताना आणि घरी परतताना पाठलाग करत होत असलेल्या छेडछाडीमुळे भीतीपोटी नेहाने शाळेत जाणे, तसेच घराबाहेर पडणेसुद्धा बंद केले. बहीण शाळेत जात नाही, कुणाशी बोलत नाही म्हणून मोठ्या भावाने तिच्याकडे विचारपूस केली. नेहाने झालेला प्रकार भावाला सांगितला. त्यानंतर तो तिला शाळेत सोडण्यासाठी जाऊ लागला.बुधवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे नेहा आणि तिच्या मैत्रिणीला शाळेत सोडून हा भाऊ घरी येण्यासाठी निघाला. दरम्यान एकतानगर परिसरात दबा धरून असलेल्या त्रिकूटाने त्याला ‘सोबत का येतोस’असे विचारत त्याला जीवघेणी मारहाण केली. इथून पुढे सोबत आलास तर ठार मारण्याची धमकी देत हे त्रिकूट पसार झाले.स्थानिकांच्या मदतीने भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची वर्दी मिळताच मानखुर्द पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.>पोलिसांनी घेतला धसकानेहरूनगर प्रकरणात सुरुवातीला किरकोळ गुन्हा दाखल करत आरोपीला रातोरात टेबल जामीन मिळाला होता. मात्र, याबाबत सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली. या गुन्ह्यात निष्काळजीपणा दाखवला म्हणून नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची बदली करण्यात आली. कुठेतरी या घटनेनंतर पोलिसांनीही धसका घेतलेला दिसत आहे.
भररस्त्यात शाळकरी विद्यार्थिनीची रोडरोमियोंकडून छेडछाड, बहिणीच्या रक्षणासाठी गेलेल्या भावावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 5:59 AM