शाळकरी विद्यार्थी ‘ड्रग डिलिव्हरी बॉय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:47 AM2018-08-27T03:47:36+5:302018-08-27T03:48:15+5:30

महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून फोनवरून ड्रग्जची आॅर्डर मिळताच, परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचविण्याची जबाबदारी सोपवण्यात येत असे

Schoolgirls 'Drug Delivery Boy' | शाळकरी विद्यार्थी ‘ड्रग डिलिव्हरी बॉय’

शाळकरी विद्यार्थी ‘ड्रग डिलिव्हरी बॉय’

Next

मुंबई : महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून फोनवरून ड्रग्जची आॅर्डर मिळताच, परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचविण्याची जबाबदारी सोपवण्यात येत असे. धक्कादायक म्हणजे अवघ्या ५० रुपयांसाठी शाळकरी विद्यार्थी डिलिव्हरी बॉय बनल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) केलेल्या कारवाईतून समोर आली.

अंधेरी आणि पश्चिम उपनगरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत एमडीचा पुरवठा करणाऱ्या आसिफ इक्बाल खान उर्फ चुहा याच्या अटकेनंतर ही बाब उघडकीस आली. आसिफला अंधेरीच्या गावदेवी डोंगर येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथील रहिवाशांच्या आसिफविरोधातील तक्रारी येत होत्या. त्याच्यामुळे परिसरातील अनेक तरुणीही एमडीच्या आहारी गेल्या होत्या. त्यानुसार, एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा एमडी जप्त केला.
एएनसीच्या वरळी कक्षाने २०१२ मध्ये गांजा तस्करीत आसिफला अटक केली होती. अडीच वर्षे चाललेल्या खटल्यातून तो निर्दोष सुटला. त्यानंतर त्याने अमली पदार्थ विक्रीची नवी शक्कल लढवली. यापूर्वी एमडी विक्रीदरम्यानही त्याच्यावर कारवाई झाली आहे. मात्र, तेव्हा एमडीचा अमली पदार्थात समावेश नसल्याने त्याची सुटका झाली. त्या दरम्यान त्याचे अनेक महाविद्यालयीन ग्राहक होते. एमडीला भाव वाढल्याने त्याने त्यांच्याशी पुन्हा संपर्क सुरू केला. ते त्याच्याशी मोबाइलवर संपर्क साधत. त्या वेळी त्यांच्याशी भेटून तो पैसे घेत असे. पुढे ठरावीक ठिकाणी बोलावून घेत असे. तेथे परिसरातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात १ गॅ्रमची पुडी सोपवून ती ग्राहकांपर्यंत देण्यास सांगत असे. ५० ते १०० मीटर अंतरावर उभे राहून तो या व्यवहारावर लक्ष ठेवायचा. याबदल्यात तो त्यांना अवघे ५० रुपये देत असे, तर काही मुलांना तो चॉकलेटवर भागवत असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंब्रा कनेक्शन
आसिफला मुंब्रा येथून एमडीचा पुरवठा होत असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. त्यानुसार, एएनसी पुढील तपास करीत आहे.

Web Title: Schoolgirls 'Drug Delivery Boy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.