ऑफलाइन उपस्थितीची शाळा करताहेत सक्ती; शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:10 PM2021-11-26T13:10:28+5:302021-11-26T13:10:44+5:30
सद्यस्थितीत शाळा ५० टक्के उपस्थितीत भरविल्या जात असल्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पालक विद्यार्थ्यांना अजूनही ऑनलाइन शिक्षण देण्यालाच पसंती देत आहेत.
मुंबई: राज्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या वर्गातील विद्यार्थ्यांची ऑफलाइन उपस्थिती ही ऐच्छिक असणार असून शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी किंवा पालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले होते. मुंबईतील काही शाळांकडून विद्यार्थ्यांवर ऑफलाइन परिस्थितीसाठी दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती पालक संघटनांकडून देण्यात येत आहे. अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई व्हावी, अशी मागणीही पालक संघटना करीत आहेत.
सद्यस्थितीत शाळा ५० टक्के उपस्थितीत भरविल्या जात असल्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पालक विद्यार्थ्यांना अजूनही ऑनलाइन शिक्षण देण्यालाच पसंती देत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी ट्विटरवर दिलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांच्या शाळेतील व्यवस्थापन त्यांना ऑफलाइन वर्गांना उपस्थित राहण्याची सक्ती करीत असल्याची महिती दिली आहे.
विद्यार्थिनीने आपले शिक्षक ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवू शकत नसल्याचे कारण देत ऑफलाइनची सक्ती करत असल्याचेही म्हटले आहे. यावर ऑल इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना यासंदर्भात लक्ष देण्याची आणि कार्यवाहीची विनंती केली आहे.