दप्तरांविना शुक्रवारी भरणार शाळा

By admin | Published: November 18, 2014 01:28 AM2014-11-18T01:28:30+5:302014-11-18T01:28:30+5:30

दप्तरात सर्व पुस्तके भरलीस का?... आई मराठीचे पुस्तक मिळेना... गृहपाठाची वही दप्तरात भरलीच नाही... शाळेला काही मिनिटांचा वेळ शिल्लक असताना पालक आणि मुलांची अशीच घाई होते.

Schools to be filled on Friday without a diploma | दप्तरांविना शुक्रवारी भरणार शाळा

दप्तरांविना शुक्रवारी भरणार शाळा

Next

मुंबई : दप्तरात सर्व पुस्तके भरलीस का?... आई मराठीचे पुस्तक मिळेना... गृहपाठाची वही दप्तरात भरलीच नाही... शाळेला काही मिनिटांचा वेळ शिल्लक असताना पालक आणि मुलांची अशीच घाई होते. पण दप्तराचे ओझे सांभाळत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारी दप्तराविना शाळेत जावे लागणार आहे. निमित्त आहे ‘वाचन दिना’चे. दक्षिण मुंबई विभागातील ४७१ माध्यमिक शाळांमध्ये शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार असून या दिवशी विद्यार्थी दिवसभर अवांतर वाचन करणार आहेत.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण निरीक्षक, दक्षिण मुंबई यांच्या वतीने शाळांमध्ये वाचन दिन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दक्षिण विभागातील ४७१ माध्यमिक शाळांमध्ये वाचन दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांनी दप्तर न घेता शाळेत यावे आणि दिवसभर अवांतर वाचन करावे. तसेच चर्चा घडवून आणावी, असे निर्देश शिक्षण निरीक्षक बी.बी. चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार शाळांनी या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत ‘वाचू आनंदे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेत सिने, नाट्य, वर्तमानपत्रे, वाहिन्या यामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या व्यक्तींनी शुक्रवारी शाळांमध्ये जाऊन त्यांना आवडलेली एखादी कथा, कविता, नाट्यकथेचा अथवा एखादा आवडीचा परिच्छेद वाचून दाखवावा. त्याचप्रमाणे ग्रंथवाचनाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत किती महत्त्वाची भूमिका राहिली आहे, या अनुषंगाने बोलावे, असे आवाहन शिक्षण निरीक्षकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Schools to be filled on Friday without a diploma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.