Join us  

शाळा झाल्या डिजिटल, विद्यार्थी झाले तंत्रस्नेही; शिक्षण विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 2:31 AM

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत २०१८ या सरत्या वर्षात १ लाख ७० हजार तंत्रस्नेही शिक्षक तसेच राज्यात एकूण ४८ हजार ५६१ प्रगत शाळा आहेत.

मुंबई : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत २०१८ या सरत्या वर्षात १ लाख ७० हजार तंत्रस्नेही शिक्षक तसेच राज्यात एकूण ४८ हजार ५६१ प्रगत शाळा आहेत. याचप्रमाणे ६६ हजार ४५८ डिजिटल शाळांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती नुकतीच शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्ये ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शाळांची संख्या ६७ हजार ८२७ इतकी आहे. शिवाय ३४ हजार इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील केवळ शाळाच प्रगत आणि डिजिटल झाल्या नसून शिक्षकही तंत्रस्नेही झाले आहेत. सध्या राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांची संख्या १ लाख ७० हजार इतकी आहे. सरत्या वर्षात शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक अ‍ॅप्सची संख्या ४ हजार ३७९ इतकी असून त्यांनी तयार केलेले ब्लॉग / संकेतस्थळांची संख्या ६ हजार ४३७ इतकी आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांना प्रशिक्षणाची मागणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यातील तब्ब्ल ५ लाख २१ हजार शिक्षकांनी निरनिराळ्या विषयांच्या प्रशिक्षणाबाबत मागणी केली आहे.जलदगतीने शिक्षण व स्पोकन इंग्रजीमुळे सुमारे ३४ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेत दाखल झाल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना, राज्य मुक्त मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा देण्याऐवजी त्या स्तरावरील अभ्याक्रम महाराष्ट्रातच सुरू झाल्यास तो विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमपणे टिकू शकेल या हेतूने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ व अभ्याक्रम तयार करण्यात आला आहे. मंडळाच्या नियामक सदस्यांमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक, स्वरूप संपत, सुलेखनकार अच्युत पालव आदींचा समावेश आहे.२०१८ या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागासाठी लोकसहभागातून प्राप्त झालेला निधी ४२४ कोटी रुपये इतका असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्राला अधिकाधिक अद्ययावत करण्यासोबत उत्तमोत्तम सुविधा मिळण्यासाठी लोकसहभागही मिळत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.प्रगत तसेच डिजिटल शाळा म्हणजे काय ?राज्यातील एकही मूल अप्रगत श्रेणीमध्ये राहता कामा नये. वाचन, लेखन, संख्याज्ञान आदींबाबत राज्यातील प्रत्येक मूल निष्णात झाले पाहिजे, हे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार ठरवून दिलेला शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण करणाºया शाळा या प्रगत शाळा म्हणून शिक्षण विभागाकडून घोषित करण्यात येतात. तर, या प्रगत शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनास मोलाचे साहाय्य करणाºया, विविध उपक्रम राबविणाºया शाळा या डिजिटल शाळा म्हणून घोषित केल्या जातात.

टॅग्स :शाळा