शाळा होत आहेत ‘क्वारंटाइनमुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:28 AM2020-08-17T01:28:58+5:302020-08-17T01:29:05+5:30

पालिकेने मुंबईच्या विविध भागांतील आवश्यक त्या ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांची, शाळांची जागा आणि पालिका शाळांचे वर्ग क्वारंटाइन सेंटर्स म्हणून वापरण्यास सुरुवात केली.

Schools becoming 'quarantine free' | शाळा होत आहेत ‘क्वारंटाइनमुक्त’

शाळा होत आहेत ‘क्वारंटाइनमुक्त’

Next

सीमा महांगडे
मुंबई : कोरोनाचा कहर मुंबई आणि महाराष्ट्रात वाढू लागला आणि रुग्णसंख्येप्रमाणे क्वारंटाइन सेंटरसाठी जागेची वानवा होऊ नये म्हणून मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्था आणि पालिका शाळांचा वापर पालिकेकडून करण्याचे निश्चित करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक संस्था आणि पालिका शाळा बंद ठेवण्याचे निर्देश शासनाकडूनच देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. पालिकेने मुंबईच्या विविध भागांतील आवश्यक त्या ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांची, शाळांची जागा आणि पालिका शाळांचे वर्ग क्वारंटाइन सेंटर्स म्हणून वापरण्यास सुरुवात केली.
मात्र आता पुन:श्च हरिओम सुरू झाले असून हळूहळू सगळे अनलॉक केले जात आहे. अशातच रुग्णदुपटीचा दरही वाढल्याने मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. या कारणाने क्वारंटाइन सेंटर्स म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या शाळा, शैक्षणिक संस्था आता मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याच्या हालचालीही शिक्षण विभागाकडून होत आहेत. एकूणच शाळा कोविड सेंटर्सच्या कामातून मुक्त होऊन पुन्हा आपल्या विद्यार्र्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड काळात क्वारंटाइन सेंटर्स म्हणून वापरण्यात आलेल्या व येत असलेल्या शाळांचा ‘लोकमत’ने केलेला हा रिअ‍ॅलिटी चेक:
पालिकेकडून शैक्षणिक संस्था व शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यात येणार असे निर्देश येताच अनेक पालक, विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक यांच्या मनात सुरुवातीला धडकी भरली. लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्या तरी पुढे विद्यार्थी इथेच येऊन शिक्षण घेणार असल्याने त्यांना होणारा संसर्गाचा धोका कसा टाळता येईल, अशी भीती पालक, शिक्षकांना वाटू लागली. अनेक पालकांनी अनेक शाळा क्वारंटाइन करण्यास विरोधही केला. काही ठिकाणी विभागीय वॉर्ड अधिकाऱ्यांना माघारही घ्यावी लागली, तर काही ठिकाणी मात्र क्वारंटाइन सेंटर्स सुरू झाले. अनेक शैक्षणिक संस्थांनी समाजाप्रति आपली जबाबदारी समजून पालिकेला आवश्यक सहकार्य केल्याचेही दिसून आले. घाटकोपरच्या पुणे विद्यार्थी भवन संचालित विद्याभवन शाळेतून तब्बल २००० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती संस्थेचे सचिव राजेंद्र बोºहाडे अभिमानाने सांगतात. पालिकेने जवळपास २०० खाटांची सोय शाळेत ६ मेपासून केली होती. ३१ जुलै रोजी शाळा पालिकेने पुन्हा ताब्यात दिली. दरम्यान, शाळेने पूर्ण सहकार्य केले आणि पालिकेने हे क्वारंटाइन सेंटर म्हणून शाळेचा ताबा सोडल्यावर त्याच्या सॅनिटायझेशन आणि साफसफाईची पूर्ण जबाबदारी पार पाडल्याची माहिती त्यांनी दिली. इतकेच काय, या तीन महिन्यांदरम्यान शाळेचा झालेला वीजबिल, पाणीपट्टी यांचा खर्चही योग्य त्या शासनमान्य भाडेप्रतिपूर्तीमधून करणार असल्याची माहिती बोºहाडे यांनी दिली. दरम्यान, शालेय अभ्यासक्रमाचे पुस्तकवाटप, आवश्यक गोष्टी यांसाठी शाळेने बाहेरच व्यवस्था केली. पालिकेने शाळा चार वेळा सॅनिटाईझ केल्यानंतरही अद्याप दोन वेळा त्याची सफाई करूनच शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्देशाप्रमाणे पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
घाटकोपरच्याच दुसºया शाळेची कहाणी मात्र थोडी वेगळी आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यम व कनिष्ठ महाविद्यालय असलेली शैक्षणिक संस्था दहा दिवसांपूर्वी क्वारंटाइन सेंटर म्हणून पालिकेकडून मुक्त करण्यात आली. मात्र अद्याप शाळेचा ताबा संस्थेला देण्यात आला नाही. शासन निर्देशाप्रमाणे पुढील महिन्यात शाळा सुरू करायची इच्छा असून त्यासाठीची आवश्यक तयारी करायची असल्याने शाळेचा ताबा संस्थेला देण्यात यावा, असे पत्र आयुक्तांना लिहिल्याची माहिती संस्थेचे नसू नरे यांनी दिली.
शिक्षण विभागाच्या विविध वॉर्डमधील पालिका शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या निर्देशांप्रमाणे मुक्त होत असून त्यांचे योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करून घेतले जात आहेू, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.
>लॉकडाऊनच्या काळात शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या यात काहीच गैर नाही. मात्र आता शाळा मुक्त केल्यानंतर त्यांची काळजी आणि साफसफाई ही विद्यार्थी, शिक्षक दोन्ही घटकांच्या दृष्टीने महत्त्वाची व आवश्यक आहे. तसेच मराठी शाळा व संस्थाचालकांचा विचार करून पालिकेने आवश्यक ती प्रतिपूर्ती करणेही आवश्यक आहे.
- जालिंदर सरोदे, कार्यवाह, शिक्षक भारती
अनलॉक होताना विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या योग्य प्रकारे केल्या जाणाºया सॅनिटायझेशनची जबाबदारी पालिकेची आहे आणि त्याचा आम्ही योग्य प्रकारे पाठपुरावा करू यात वाद नाही. शिक्षकांची, विद्यार्थ्यांची सुरक्षितताही त्यांच्या पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेच, तसेच समाजाच्या दृष्टीनेही आहे. शिवाय क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यात आलेल्या शाळांनाही योग्य प्रतिपूर्ती प्राप्त होईल याची काळजी आम्ही घेऊ.
- साईनाथ दुर्गे, शिक्षण समिती सदस्य, शिवसेना

Web Title: Schools becoming 'quarantine free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.