Join us

बीडमध्ये सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर?; भुजबळांनी आदेश शेअर करत उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 2:36 PM

बीडमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे यांच्या रॅलीला सुरूवात झाली

मुंबई - मराठा आरक्षणाची मागणी अद्यापही सरकारने पूर्ण केली नाही, तसेच दिलेली मुदतही रविवारी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. यात ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सभेच्या आधी सकाळी बीड शहरातून रॅली निघाली आहे. विशेष म्हणजे या सभेच्या पार्श्वभूमीवरच आज बीडमधील जिल्हा परिषदांच्या शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे. त्यावरुन, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचा शिक्षणाधिकारी यांचा आदेश शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. 

बीडमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे यांच्या रॅलीला सुरूवात झाली. दरम्यान, रॅलीला सुरूवात झाल्यानंतर जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. याचठिकाणी जरांगे पाटील यांची मोठी सभाही होत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सभेसाठी मराठा समाज बांधव जमले आहेत. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यावरुन, छगन भुजबळ यांनी, शाळांना आज सुट्टी देण्याचे कारण काय?, असा सवाल उपस्थित केला आहे. 

''कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच, 

आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सुट्टीचा आदेश सोशल मीडियातून शेअर केला आहे. 

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नसता महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे, अशी मागणीही भुजबळ यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

टॅग्स :छगन भुजबळमनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणशाळाबीड