यू डायसमधील माहिती भरण्यासाठी शाळांकडे १५ मेपर्यंतची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:03 AM2021-05-02T04:03:51+5:302021-05-02T04:03:51+5:30
१५ मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांसमोर माहिती अपडेट करण्याचा प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शाळांना १ मेपासून सुट्ट्या ...
१५ मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांसमोर माहिती अपडेट करण्याचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळांना १ मेपासून सुट्ट्या घोषित करण्यात आल्या असून, सध्या शाळा महाविद्यालये बंद असून, केवळ अति महत्त्वाच्या व निकालाच्या कामासाठीच शिक्षकांना शाळांमध्ये बोलण्याच्या सूचना आहेत. अशा परिस्थितीत यू डायसमधील माहिती भरण्यासाठी शाळांना या आधी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, दूर ठिकाणांहून शाळेत येणाऱ्या शिक्षकांनी शाळांमध्ये माहिती कशी भरावी? वेळेत यू डायसची माहिती कशी पूर्ण होणार, असा प्रश्न मुख्याध्यापक उपस्थित करत होते. त्यानुसार, शाळांनी यू डायसमधील माहिती १५ मेपर्यंत पूर्ण करून पुढे तालुका जिल्हा स्तरावर पाठविण्याची प्रक्रिया करावी, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत. तरीही १५ मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊन काळात प्रवास कसा करायचा आणि शाळांमध्ये सदर माहिती भरण्यासाठी कसे पोहोचायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर कायम आहे.
यू डायस प्लस प्रणाली ही भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या यू डायस प्लस ऑनलाइन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य, जिल्हा, महानगरपालिका व तालुका, तसेच शाळास्तरावरून ऑनलाइन पद्धतीने यू डायस प्लस प्रणालीमध्ये ३० मे, २०२१ पर्यंत राज्यातील शाळांची माहिती ऑनलाइन संगणीकृत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, १५ मेपर्यंत शाळांनी माहिती संगणीकृत करून देण्याचे आदेश दिल्याने मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात आहे. त्यातच राज्यात कडक लॉकडाऊन असल्याने, रेल्वे, मेट्रो व सार्वजनिक वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच उपलब्ध असल्याने शाळेत कसे पोहोचावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
सूचनांनुसार शाळास्तरावरील माहिती १५ मे, तालुका स्तरावरील माहिती २० मे, जिल्हा स्तरावरील माहिती २५ मेपर्यंत सादर करायची आहे. त्यानंतर, ३१ मे रोजी राज्याकडून सदर माहिती केंद्राकडे सादर केली जाणार आहे. सदर माहितीत जर एक वर्ग असेल, तर माहिती भरण्यास अडचण येत नाही, परंतु जर एकापेक्षा जास्त वर्ग असल्यास कटलॉग, शिक्षक सर्व्हिस बुक, शिक्षक माहिती, लेखाविषयक माहिती ही शाळेत आहे. त्यामुळे घरून माहिती भरण्यास अडचण येत आहे. मुख्याध्यापक व माहिती भरणारे शाळेतील लिपिक हे वेगवेगळ्या निवासस्थानी राहतात, सदर माहिती ही मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली भरणे व अंतिम करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरली गेल्यास त्याचा तोटा शाळेला होणार असल्याने, यू डायसमध्ये माहिती भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक करत आहेत.
यू डायसची माहिती भरणे आवश्यक का?
समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यू डायस प्लस प्रणालीमार्फत संगणीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग होणार असून, याच माहितीच्या आधारे भारत सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान मंजुरी देण्यात येते. यू डायस प्लस प्रणालीमधील माहितीचा उपयोग वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे, तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरिता, तसेच राज्याचा शैक्षणिक निर्देशांक देशपातळीवर निश्चित करण्याकरिता (पीजीआय) करण्यात येतो.