शाळेचा लोखंडी गेट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:16 AM2018-05-26T02:16:30+5:302018-05-26T02:16:30+5:30
बोनकोडेतील पालिका शाळेतील घटना : अनेक वर्षांपासून रखडलेले बांधकाम
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील अनेक वर्षांपासून बांधकाम रखडलेल्या पालिकेच्या शाळेचे लोखंडी गेट कोसळून शुक्रवारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. परिसरातील काही लहान मुले त्या ठिकाणी खेळत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोनकोडे येथे विविध कारणांनी सदर शाळेचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी परिसरातील आठ ते दहा लहान मुले क्रिकेट खेळत होती. दरम्यान शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत रिक्षा उभी करण्यासाठी रिक्षाचालकाने शाळेचे लोखंडी गेट उघडले. मात्र त्याने गेट उघडेच ठेवल्याने मुलांचा बॉल बाहेर जात होता. यामुळे ते गेट बंद करण्यासाठी सौरभ चौधरी (१२), नीलेश देवरे व त्यांचा मित्र आदित्य हे तिघे तेथे गेले होते. त्यांच्याकडून गेट बंद करण्यासाठी पुढे ढकलले जात असताना, त्याला कोणताही ठोस आधार नसल्याने ते खाली कोसळले. या वेळी आदित्य लांब पळाल्याने तो वाचला. मात्र सौरभ व नीलेश हे दोघे अंगावर लोखंडी गेट पडल्याने गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात नेले होते. सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने फोर्टिस रुग्णालयात हलवले. तेथे बेड शिल्लक नसल्याच्या कारणाने अर्धा तास उपचाराला उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप सौरभचे मामा संतोष पाटील यांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहर अभियंते मोहन डगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून मयत सौरभ व जखमी नीलेशच्या कुटुंबीयांचीदेखील भेट घेतली. घडलेल्या घटनेप्रकरणी मयत सौरभचे वडील सुनील चौधरी यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार शाळेचा ठेकेदार याच्यासह पालिका अधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सौरभच्या मृत्यूला फोर्टिस रुग्णालय व्यवस्थापनदेखील जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी संतोष पाटील यांनी केली.
पालिकेवर टीका
वापराविना असलेली पालिका शाळेची ही इमारत गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे. रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी दारूच्या पार्ट्यादेखील रंगत असल्याचे आवारात पडलेल्या बाटल्यांवरून दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावरदेखील टीका होऊ लागली आहे.