शाळांचा प्रश्न; पालिकेने खासगी संस्थांना दिलेल्या जागा ताब्यात घ्या, पालिकेच्या लेखापरीक्षकांची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:42 IST2025-03-21T13:41:18+5:302025-03-21T13:42:10+5:30
मुंबई : मुंबई महापालिकेने खासगी संस्थांना ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर शाळा चालवण्यासाठी दिलेल्या जागांचा व्यापारी कारणांसाठी ...

शाळांचा प्रश्न; पालिकेने खासगी संस्थांना दिलेल्या जागा ताब्यात घ्या, पालिकेच्या लेखापरीक्षकांची शिफारस
मुंबई : मुंबई महापालिकेने खासगी संस्थांना ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर शाळा चालवण्यासाठी दिलेल्या जागांचा व्यापारी कारणांसाठी वापर होत असल्याचा ठपका ठेवत या जागा पालिकेने पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी शिफारस मुंबई पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
संबंधित शाळा या मोक्याच्या जागेवर आहेत. त्या जागा ताब्यात घेऊन मुंबई पब्लिक स्कूलच्या उपक्रमानुसार वापरात आणल्यास पालिकेला त्याचा लाभ होईल, असे लेखापरीक्षकांच्या अहवालात नमूद केले आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्नही अहवालात उपस्थित केला आहे.
अद्याप खातरजमा नाही
पालिकेच्या जमीनदोस्त शाळा आणि त्या शाळांच्या जागांवरील इमारतींचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात आहे, याची खातरजमा कागदपत्रांवरून करता येत नसल्याचेही म्हटले आहे.
मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम
२०१८ मध्ये पालिका शाळांमधील मुलांची संख्या कमी झाल्याने ३५ शाळा बंद केल्या होत्या. या शाळा सार्वजनिक लोक सहभाग कार्यक्रमांतर्गत खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
त्यानंतर १५ शाळा खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आल्या होत्या. आता मात्र त्या शाळा पुन्हा ताब्यात घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल उपक्रमाची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे त्या धर्तीवर अनेक शाळा निर्माण करण्याची गरज आहे, असा अभिप्रायही या अहवालात दिला आहे.