मुंबईतील शाळा पाहताहेत अनलॉक होण्याची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:23 AM2021-02-10T02:23:38+5:302021-02-10T02:23:55+5:30
अद्याप महापालिका क्षेत्रातील पाचवी ते बारावीच्या शाळा बंदच
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून बंद असलेल्या राज्यातील शाळा व शैक्षणिक संस्था टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊन सुरु झाल्या आहेत. राज्यातील मुंबई महापालिका क्षेत्र वगळता इतर अन्य जिल्ह्यांत आधी २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांतील विद्यार्थी उपस्थिती ही हळूहळू वाढत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव व नवीन आलेला स्ट्रेन पाहता मुंबई महापालिका आयुक्तांनी अद्याप मुंबईतील कोणत्याच शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. डफावी बारावीच्या परीक्षा अवघ्या २ ते ३ महिन्यावर असताना पालक व विद्यार्थी आतुरतेने शाळा सुरू करण्यासंदर्भातील पालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे; लक्ष ठेवून आहेत व त्या लवकर सुरु करण्याची मागणीही काही पालकांकडून होत आहे.
पालिका शिक्षण विभागाकडून १८ जानेवारीपासून वाणिज्य दूतावासाच्या शाळा (अमेरिकन अँड अदर काउन्स्लेट स्कुल )सुरु करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्य शिक्षण मंडळासह , सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएससारख्या मंडळांना त्यांच्या नियोजित परीक्षा तसेच ज्या परीक्षांचे नियोजन येत्या काही काळात होईल अशा परीक्षा घेण्यास ही परवानगी दिली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्तावही आयुक्तांकडे पाठवला होता. मात्र पालिकेच्या निर्देशानुसार १६ जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत मुंबईतील पाचवी ते बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हे ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण घेत आहेत .
शाळा व शैक्षणिक संस्था कधी व केव्हा सुरु करायच्या यासंदर्भातील आढावा शिक्षण विभाग व आयुक्त सातत्याने घेत आहेत. आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील शाळांना त्याप्रमाणे सूचना देण्यात येतील आणि शाळा सुरु होण्याआधी शाळांना आवश्यक सुविधांची , सुरक्षा साहित्याचा पुरवठा केला जाईल. विद्यार्थ्यांना मास्क , शाळांना सॅनिटायझर, आवश्यकी साहित्य यांसाठी आवश्यक तरतूद शिक्षण अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
- संध्या दोशी, अध्यक्षा - शिक्षण समिती,
मुंबई महानगरपालिका
मुंबई उपनगर
५ वी ते आठवीच्या
एकूण शाळा -२४३१
पाचवी - ३८८४०
सहावी -३६५४८
सातवी - ३६०७३
आठवी - २८७०५
एकूण - १४०१६७
मुंबई शहर
५ वी ते आठवीच्या
एकूण शाळा - १५६०
पाचवी - १३७२७५
सहावी -१३७४१३
सातवी - १३७५५९
आठवी - १४८२६१
एकूण- ५६०५०८
नववी ते बारावीच्या शाळांची संख्या
मुंबई (उपसंचालक कार्यालयांतर्गत )- १८०२
विद्यार्थी संख्या - ७५१२४२