पालिका आयुक्तांचे आदेश : शिक्षण विभागाकडून सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या शाळांना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत सध्या शाळा सुरू होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या.
कोरोनाचा इतर देशांतील वाढता प्रादुर्भाव, दुसरी लाट येण्याची शक्यता आणि पुढील ४ ते ६ आठवडे अधिक खबरदारी घेण्याची गरज या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने केलेले दहावी, बारावी पुरवणी परीक्षांचे नियोजन तसेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
* दहावी, बारावीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्याची मागणी
३१ डिसेंबरनंतर शाळा महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनामार्फत शाळा, महाविद्यालयांच्याया इमारती, वर्गखोल्यांचे सॅनिटायजेशन आणि थर्मल गनसह इतर कोविड प्रतिबंधक साधने, उपायांची पूर्तता करावी अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी पालिका आयुक्त व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. शिक्षण विभागाने आवश्यक त्या वर्क बुक आणि वर्क शीट त्वरित द्याव्यात, जेणेकरून शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रगती तपासता येऊ शकेल. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये या वर्षापुरते आवश्यक ते बदल करावेत, व्हॅक्सिन आल्यानंतर डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह सर्वप्रथम ते विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी ताई यांना उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केल्या.