नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असला तरी जागतिक स्तरावर कोविड विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता सतर्क राहणे आवश्यक असल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा १६ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील सर्व शाळा १६ जानेवारीपर्यंत बंदच राहणार असून, ऑनलाइन शिक्षण मात्र पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असला तरी जागतिक स्तरावर कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यादृष्टीने आणखी काही काळ खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्वच शाळा १६ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू नसल्या तरी विद्यार्थ्यांचे नियमितपणे ऑनलाइन क्लासेस तसेच अन्य उपक्रम सुरू असणार असून, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार असल्याचेही निर्देश नार्वेकर यांनी दिले आहेत.