मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या शाळेची संरक्षक भिंत कोसळून आजम खान या १०वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी शिवाजी नगर गोवंडी येथे घडली. या घटनेत ९ जण जखमी झाले आहेत. सहा जणांना घरी सोडण्यात आले असून, तिघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरातील रोड नंबर १३ येथे ही पालिकेची मराठी माध्यमाची शाळा आहे. ३५ ते ४० वर्षे जुन्या असलेल्या या शाळेची अनेक वर्षे डागडुजी न झाल्याने ही शाळा कोसळण्याच्या अवस्थेत होती. गेल्या चार महिन्यांपासून या शाळेच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. शाळा परिसरातील खोदकामामुळे त्याचे हादरे शाळेच्या भोवताली असलेल्या संरक्षण भिंतीला बसत होते. त्यामुळेच आठ दिवसांपूर्वी एका बाजूला या संरक्षण भिंतीला तडेदेखील गेले होते. कंत्राटदाराने याकडे कानाडोळा केला. मंगळवारी दुपारी परिसरातील काही रहिवासी आणि लहान मुले या ठिकाणी खेळत असताना अचानक शाळेची संरक्षक भिंत कोसळली. रहिवाशांच्या हे लक्षात येताच अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अली हसन (४०), माशूक अहमद (२६), रशीद (१०), अलिया परविन (१०), सयाफ अली (३०), कलाम सिद्दिकी (२०), मोसिन सोफिन खान (२५) आणि शमा परवीन (५) हे जखमी झाले. यातील सहा जणांवर शताब्दी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. तर तिघांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)---------कारवाईची मागणी आठ दिवसांपूर्वीच या ठिकाणी भिंतीला तडे गेल्यानंतर स्थानिक समाजसेवक इर्फान दिवटे यांनी याबाबत पालिका आणि पोलिसांना माहिती दिली होती. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेला कंत्राटदार आणि इतर व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
शाळेची संरक्षक भिंत कोसळून मुलाचा मृत्यू
By admin | Published: September 30, 2015 1:57 AM