मुंबई : राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच जाहिर केला आहे.या निर्णयाबद्धल उलटसुलट प्रतिक्रिया येणार असल्या तरी कोविडची दुसरी लाट येणार नाही हे गृहीत धरूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. आंध्रप्रदेशात शाळा सुरू केल्यावर तेथील विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्याची बातमी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रयोगिक तत्वावर कोविड शून्य भागात विशेष काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात अशी मागणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
ज्या भागात गेल्या महिनाभरापासून शून्य कोविड रुग्ण आहेत आणि ज्या ग्रामीण भागात शिक्षक व विद्यार्थी हे त्या शाळेच्या परिसरात नव्हे तर गावातच राहतात. अशा शाळा पहिल्या टप्यात सुरू व्हाव्यात. या शाळांची संख्या जरी कमी असली तरी विद्यार्थी व पालकांची मानसिकता तयार होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या भागात तसेच आदिवासी गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याने येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. ज्या भागात इंटरनेटची रेंज नाही तेथील विद्यार्थी हे रेंज मिळण्यासाठी टेकड्यांवर जाऊन ऑनलाईन शिक्षण घेतात अशी ग्रामीण भागातील परिस्थिती आहे. तर काही विद्यार्थ्यांनी एक दिवसही ऑनलाईन शिक्षण घेतलेले नाही. दोन कोटी 24 लाख विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थानी ऑनलाईन शिक्षण घेतले याची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध असेल असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तांडा शाळा, वीटभट्टी शाळा,ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळांसाठी आपण प्रयत्न करावेत.आपण सुरू केलेली टॅब योजना सुरू करण्याची आजही गरज असून व्हर्च्युल क्लासची शहरांमध्ये गरज आहे अशी भूमिका डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहे.