- स्नेहा पावसकर बालविज्ञान परिषदेत यंदा ठाण्यातील मराठीशाळांच्या प्रकल्पांची राज्यस्तरासाठी निवड झालेली नाही. गेल्या २७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, मराठीशाळांमधील पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचा निरूत्साह याला कारणीभूत आहे. दुसरीकडे ठाण्यातील इंग्रजी शाळांचा मात्र या परिषदेसाठी उत्साही सहभाग होता आणि ठाण्यातील दोन इंग्रजी शाळांच्या तीन प्रकल्पांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजलही मारलेली आहे. त्यामुळे मराठी शाळांच्या या निरूत्साहाबाबत या परिषदेचे महाराष्ट्रातील कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांच्याशी साधलेला हा संवाद...राष्ट्रीय विज्ञान परिषदेत ठाण्यातील मराठी शाळा मागे पडण्याचं नेमकं कारण काय?विद्यार्थी या उपक्रमाचा केंद्रबिंदू असला तरी पालक, शिक्षक आणि त्या शाळांचे व्यवस्थापन त्याला तितकेच कारणीभूत आहे. मुळातच मराठी शाळेतील पालकांमध्ये फारशी सजगता नाही. असली तरी त्यांचा कल हा स्कॉलरशिप किंवा तत्सम ग्रेड देणाऱ्या परीक्षा, मैदानी खेळांचे क्लास याकडे असतो. या विज्ञान प्रकल्पांतून मुलांना काही गुण, प्रशस्तीपत्रक मिळत नाही. त्यामुळे त्यात वेळ का घालवायचा, असा त्यांचा विचार असतो. दुसरीकडे मराठी शाळेतील शिक्षकांना शासनाचीच अनेक कामे असतात. मात्र, शिक्षकही राज्य शासनाची कामे, त्यांचे उपक्रम ज्याबाबत त्यांना शासनाला उत्तरं द्यावी लागतात, तीच कामे ते प्राधान्याने करतात. शाळा व्यवस्थापन हे आपली विद्यार्थीसंख्या कशी टिकून राहील, या चिंतेत असतात. गुणवत्तेपेक्षा त्यांचा संख्या वाढवण्यावर भर असतो.या निरुत्साही मानसिकतेचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम होतो?मराठी शाळांमधली मुले ही केवळ पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासावरच यश मिळवतात. पुस्तकबाह्य अभ्यास त्यांना माहीतच नसतो. परिणामी, बाहेरील स्पर्धेच्या जगात मराठी शाळांमधील मुले मागे पडतात.पालक आणि शिक्षकांची मानसिकता कशी बदलावी?क्रमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त असलेल्या अभ्यासाची माहिती पालकांना करून दिली पाहिजे. शिक्षकांनीही थिअरीपेक्षा प्रत्यक्ष कृती करणारा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला पाहिजे. तसेच कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी-शिक्षक हे शाळेचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे इंग्रजी शाळांचे शिक्षक शाळेचे नाव मोठे करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेतात आणि स्वत:ही त्यांना मार्गदर्शन करतात. ही बाब मराठी शाळांतील शिक्षकांनी त्यांच्याकडून शिकली पाहिजे.विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अशा विज्ञान परिषदांत सहभागाची किती गरज आहे?विज्ञान परिषद आणि त्यातील प्रकल्पांचा उद्देशच मुळात असा आहे की, समस्या जाणून त्यावर सखोल अभ्यास करावा आणि त्यावर उपाय शोधून ती सोडवणे. आज आपल्या सभोवतालच्या समस्या या इतर कोणी नाही, आपल्यालाच सोडवायच्या आहेत. स्थानिक प्रश्न तर नवनवीन उद्भवत असतात. त्यामुळे अशा परिषदांमध्ये सहभाग घेऊन मुलांनी स्थानिक प्रश्नांची उकल करणे गरजेचे आहे.राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत या वर्षी ठाण्यातील मराठी शाळांचे प्रकल्प मागे पडले आहेत. मात्र, यासाठी पालक, शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रकल्पांतून नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची आणि प्रश्नांची उकल करण्याची क्षमता मराठी शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे.- सुरेंद्र दिघे, कार्यकारी अध्यक्ष, बाल विज्ञान परिषद, महाराष्ट्र
'प्रश्नांची उकल करणारे विद्यार्थी शाळांनी तयार करावे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:36 AM