मुंबई : पालकांकडे शाळांनी शुल्कासाठी तगादा लावू नये यासाठीचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यातच लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक पालकांचे उत्पन्न बुडाले असून पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये यंदा शाळांनी शुल्कवाढ करू नये असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शाळांना द्यावेत अशी मागणी पालक आणि संघटनांकडून शिक्षण मंत्र्यांकडे होत आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांनी यंदा पालकांच्या शुल्कात २० टक्के कपात करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून केली आहे.राज्यातील अनेक शाळा १०त्क्के किंवा त्याहून अधिक म्हणजेच ३० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढ करत आहेत तर काहींनी केल्या असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे पालकनी केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पुढील शैक्षणिक वर्षाचे खर्चाचे नियोजन कसे करावे असा प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. यासाठी शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी दिली आहे.कोरोनाचा आर्थिक स्फवरूपातील फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत सगळ्याच मंडळाच्या शाळांनी कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ करू नये असे निर्देशशिक्षण विभागाने शाळांना द्यावेत अशी मागणी केली आहे. यंदा शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होणार असल्याने शाळांनी शुल्कात २० टक्के कपात करावी अशी सूचनावजा मागणीही मनविसेने केली असल्याचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी संगीतले. अनेक शाळांचे वर्ग हे यंदा ऑनलाईन सुरु आहेत. त्यामुळे दरवर्षी शाळांना करावा लागणारा वीज बिल व अन्य शैक्षणिक सेवा सुविधावरील खर्च प्रत्यक्ष खर्च कमी होणार आहे. त्यामुळे पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शाळांनी शुल्क कपातीसाठी पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रिया चेतन पेडणेकर यांनी दिली आहे.