सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लवकरच शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. पण विद्यार्थी दीड वर्षाहून अधिक काळ घरात आहेत. त्यांना काही दिवसांत शाळेत पाठवायचा निर्णय घेताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. शाळेत जाणारे मूल हे शाळा प्रशासन व पालक या दोघांच्या केंद्रस्थानी राहील, यासाठी आखणी करणे गरजेचे असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ आणि चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य व्यक्त करीत आहेत.
शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळा सुरु करणे हा स्वागतार्ह निर्णय असून मुलांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाने ठेवलेली लवचिकता महत्त्वाची असल्याचे मत चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य आणि मुलांच्या वर्तन विकासातील तज्ज्ञ समीर दलवाई यांनी व्यक्त केले. मागील दीड वर्षाहून अधिकच्या काळात मुलांच्या खाण्याच्या, बसण्याच्या, शिस्तीच्या सवयीत बदल झाल्याने ते हळूहळू पूर्ववत होईल याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. तसेच शाळा सुरु झाल्यावर अभ्यासक्रम कसा, कुठून, केवढा असायला हवा यायचे नियोजन करायला हवे. त्यामुळे मुलांना एकदम अभ्यासाचा ताण येणार नाही, असे मत त्यांनी मांडले.
चाईल्ड टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचा अवलंब शाळा सुरु करताना होईलच मात्र या शिवाय हायब्रीड मॉडेल म्हणजे काही दिवस ऑनलाइन, काही दिवस ऑफलाइन अशा पद्धतीने वर्गांचे नियोजन केल्यास मुलांना वातावरणात पूर्ववत होण्यास मदत होईल असा सल्ला चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी दिला.
याशिवाय स्वच्छतागृहांची, वर्गांची, बाकांची स्वच्छता आवश्यक आहेच मात्र मुलांचा डब्बा, पिण्याचे पाणी त्यांनी स्वतः आणले पाहिजे. सुरुवातीच्या शाळांच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भागापेक्षा भावनिक, मानसिक भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास मुलांसाठी सोयीचे ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.