शिक्षण विभाग :१ मे ते १४ जूनपर्यंत विद्यार्थी, शिक्षकांसाठी सुटी जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील वर्षी मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागले आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. तेव्हापासून ऑनलाइन शिक्षणाला सुटीच न मिळाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी अखेर यंदा तरी उन्हाळ्याची सुटी अधिकृतरीत्या जाहीर करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवार १ मे २०२१ म्हणजे आजपासून १४ जून २०२१ पर्यंत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्या जाहीर करण्याच्या सूचना द्याव्यात असे निर्देश शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय उपसंचालकांना दिले आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेऊन तेथे २९ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात येतील.
शैक्षणिक वर्षांच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दरवर्षी मार्चअखेरपर्यंत अध्ययन समाप्ती होऊन एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतात. त्यानंतर उन्हाळी सुटीला सुरुवात होते. पण यंदा कोरोनामुळे गणपती आणि दिवाळीतही विद्यार्थी, शिक्षकांना ऑनलाइन अभ्यासातून सुटी दिली नव्हती. पहिली ते अकरावीपर्यंतच्या सर्व वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे सध्या ऑनलाइन शिक्षणही बंद झाले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मिळणारी उन्हाळी सुटी शाळांना जाहीर करावी, अशी मागणी शिक्षण आणि मुख्याध्यापक संघटनांनी लावून धरली हाेती. अखेर ती मान्य करण्यात आली.
* बारावीच्या शिक्षकांना गरजेनुसार उपस्थित रहावे लागणार
शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाचे काम करून निकालाचे काम पूर्ण करायचे असून, लॉकडाऊन संपल्यावर पहिली ते नववी आणि अकरावीच्या निकालासंदर्भात कार्यवाही करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने आवश्यकता भासल्यास त्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित रहावे लागणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
सुटी मिळाल्यावर गावी जाऊ नका
मे महिन्यांच्या सुटीत महापालिकेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबई बाहेर जाऊ नये, असे निर्देश महापालिका प्रशासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. कोविडच्या परिस्थितीत बाहेरगावी जाणे काहीसे धोकादायक असल्याने मुंबईबाहेर न जाण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.