लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. पण, आता त्या ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शुक्रवारी तसे निर्देश दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार ते सहा आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी विचारविनिमय केला. त्यानुसार, जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ऑनलाइन क्लासेस तसेच अन्य उपक्रम नियमित सुरू असणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून ३० ऑक्टोबरनंतर शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. शिक्षकांनी शाळेत ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध उपक्रम, पर्यायी शिक्षण या सर्व बाबींवर काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनाला बंधनकारक असेल, असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ठेवण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.
(पान १ वरील शाळेच्या बातमीसाठी जोड.)