रद्द नोटा बदलण्यासाठी शाळेचा अनोखा प्रताप
By admin | Published: November 13, 2016 03:58 AM2016-11-13T03:58:34+5:302016-11-13T03:58:34+5:30
चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चालविण्यासाठी नानाविध शक्कली लढविल्या जात आहेत. भांडुपच्या एका शाळेने विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी
मुंबई : चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चालविण्यासाठी नानाविध शक्कली लढविल्या जात आहेत. भांडुपच्या एका शाळेने विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी महिनाभरापूर्वी भरलेले पैसे त्यांना परत करून, सुटे पैसे आणण्याचा सल्ला दिल्याने एकच गोंधळ उडाला.
भांडुप पश्चिमेकडील अमरकोर विद्यालयाने हा प्रताप केला आहे. या शाळेत दहावीचे जवळपास दीडशेहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. बोर्डाच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना ४१५ रुपये, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ४०५ रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले. मुलांनी महिन्याभरापूर्वीच ही रक्कम शाळेच्या शिक्षकांकडे सोपविली होती.
अशात शाळेकडून ही रक्कम बोर्डाकडे भरणार, त्या पूर्वीच नोटा रद्द करण्याचा निर्णय झाला. अशा वेळी या नोटा चलनात कशा आणायच्या, म्हणून शाळेने विद्यार्थ्यांकडे या
नोटा सोपविल्या आणि पैसे सुटे
करून आणून देण्याचा
सल्ला दिल्याचे शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आधीच घरात सुटे पैसे नाहीत,
म्हणून वैतागलेल्या पालकांच्या संतापात यामुळे भर पडलेली दिसून आली.
शाळेने स्वत:ची जबाबदारी टाळून ती विद्यार्थ्यांवर सोपविण्याचा प्रयत्न केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक सुनील वागळे यांच्याकडे विचारणा केली असता, हे पैसे महिनाभरापूर्वी भरलेले नसून, काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले होते. शाळेकडून हे पैसे खात्यात जमा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांकडून त्यांनीच दिलेल्या नोटा बदलून आणणे अधिक सोइस्कर वाटले, म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
म्हाडाही स्वीकारणार पाचशे, हजारच्या नोटा
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडाच्या विभागीय घटकाच्या अधिपत्याखाली असलेल्या वसाहतींमधील संस्थांची/ सदनिकांची/ भूखंडांची वसुली/थकबाकी संबंधित भाडेवसुलीकाराकडे अथवा भाडेवसुली कार्यालयात जुन्या ५०० किंवा १ हजार रुपयांच्या नोटा भरून करता येणार आहे. १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.
या सेवेचा लाभ घेण्याकरिता आपल्याकडील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पारपत्र अथवा पॅनकार्ड यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित आणि साक्षांकित
प्रत सोबत आणण्याचे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात
आले आहे.
लॅपटॉप, गॅझेटचा बाजार थंडावला
लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्पीकर्स, आयपॅड, टॅब यासह अन्य गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी उडणारी झुंबड गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडावली आहे. दररोज या बाजारात होणारी कोटींची उलाढाल आता हजारोंच्या घरात आल्याने विक्रेते चिंतेत आहेत.
लॅपटॉप, कॉम्प्युटरची खरेदी अथवा कॉम्प्युटरचे सुटे भाग व अन्य गॅझेट खरेदी करण्यासाठी शनिवारी लॅमिंग्टन रोडला गर्दी असते. मुंबईतले लॅमिंग्टन रोड मार्केट येथे रविवारी बाजार बंद असल्याने, शनिवार दुपारपासून रात्री साडेआठ नऊपर्यंत लॅमिंग्टन रोडला गर्दी असते, पण बुधवारपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले आहे. बुधवार, गुरुवारी बाजारामध्ये ग्राहकच नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
अन्य दिवशी शनिवार दुपारपासून ग्राहकांची गर्दी व्हायला सुरुवात होते, पण आता सायंकाळपर्यंत आलेल्या ग्राहकांची संख्या नगण्य असल्याचे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे. या मार्केटमध्ये रस्त्यावर असलेल्या दुकानदारांचा दिवसाला धंदा हा ५ ते ७ हजार रुपये इतका असतो, तर दुकानात हा धंदा सरासरी अडीच ते तीन लाखांच्या घरात जातो, पण आता हा धंदा हजारोंच्या घरात आला आहे. त्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत आहे.
अनेकांना या बाजारामध्ये प्लॅस्टिक मनी चालू शकतात, हे माहीत नसल्यानेही बाजारात गर्दी कमी आहे, तर दुसरीकडे सर्वांचाच वेळ हा बँकेच्या रांगेत जातो आहे. आम्ही आमच्या काही लोकांना बँकेतून पैसे बदलून आणण्यासाठी पाठविले होते, पण चार तास रांगेत उभे राहिल्यावरही पैसे मिळाले नाहीत. काही ग्राहकांना वस्तू पोहोचवायच्या होत्या, पण माझ्याकडे वाहतुकीसाठी द्यायला पैसे नसल्याने, त्या वस्तू पोहोचवता आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकही नाराज आहेत. आॅनलाइन व्यवहार करताना सर्व्हरमुळे त्रास होत आहे. छोट्या व्यावसायिकांसमोर अनेक प्रश्न आहेत. पुढचा महिनाभर असेच चालू राहण्याचे चिन्ह आहे, पण याचा मोठा फटका गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंना बसला असल्याचे, लॅमिंग्टन रोड येथील दुकानदार मनीष काळे यांनी सांगितले.