शाळांना कोट्यवधीचा होणार फायदा
By admin | Published: May 4, 2017 06:25 AM2017-05-04T06:25:01+5:302017-05-04T06:25:01+5:30
शाळेत संगणक विषयाची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या अभ्यासक्रमात एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर गेल्या कित्येक
मुंबई: शाळेत संगणक विषयाची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या अभ्यासक्रमात एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून केला जात आहे. यामुळे गेली कित्येक वर्षे अद्यायावत सॉफ्टवेअर झाल्यावर शाळांना पैसे खर्च करावे लागत होते, पण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) अभ्यासक्रमात बदल केल्याने शाळांवर पडणारा कोटी रुपयांचा भुर्दंड कमी झाला आहे.
राज्यातील शाळांमध्ये आयसीटी विषय शिकवण्यासाठी एकाच विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळत होते आणि शाळांचे पैसेही मोठ्या प्रमाणावर खर्च होत होते. या विषयाचा पाठपुरावा कंझ्युमर गाइड्न्स सोसायटी आॅफ इंडियातर्फे (सीजीएसआय) घेण्यात आला. शिक्षण विभागाशी या संदर्भात पत्रव्यवहार केला. शाळांना खर्च कराव्या लागणाऱ्या पैशांविषयी माहिती देण्यात आली.
शहरातील एका शाळेत जवळपास ३० संगणक असतात. एका संगणकासाठी आधीच्या सॉफ्टवेअरसाठी १५ हजार रुपये मोजावे लागत होते. अद्यायावत झाल्यावर अधिक पैसे भरावे लागत होते, पण आता ‘ओएस’मुळे शाळांचे २ हजार कोटी रुपये प्रत्येक शैक्षणिक संस्थेचे वाचणार आहेत, याविषयी शिक्षण मंडळाला माहिती दिल्याचे फोरमचे डॉ. मनोहर कामत यांनी सांगितले.
डॉ. कामत यांनी पुढे सांगितले, सीजीएसआयच्या पाठपुराव्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. शाळांच्या खर्चात बचत होणार आहे. शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये दर दोन-एक वर्षांनी बदल होतात. अपडेट झालेले सॉफ्टवेअर घेण्यासाठी हजारो रुपये आकारले जातात.
अशा प्रकारे शाळांचे कोटी रुपये खर्च झाले आहेत, पण यापुढे शाळांमध्ये ओपन सोर्स (ओएस) सीस्टिम वापरण्यास सुरुवात करावी, अशी मागणी सीजीएसआयने शिक्षण विभागाकडे केली होती. या मागणीला शिक्षण विभागाने मान्यता दिल्याने शाळेतील आयटी विषयात बदल करण्यात आले आहेत. आठवी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर अँड ओपरेटिंग सीस्टिम’चा वापर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)