उमेश कुमार रुस्तगी, संचालक, नेहरू विज्ञान केंद्र
राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारीला साजरा करावा, असे १९८६ मध्ये देशातील वैज्ञानिकांनी सुचवले. सरकारनेही त्याला मान्यता दिली. त्यानुसार पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन १९८७ मध्ये साजरा झाला. हा दिवस सर सी. व्ही. रमन यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीचा भाग होता. देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि इनोव्हेशनसाठी प्रेरित करणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून पुढील पिढ्यांसाठी विज्ञान हे जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे हा होता.
विज्ञान आणि तंत्रज्ञान नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग राहिले आहे. ते आपल्या जीवनात इतके समरस झाले आहे की त्याचे महत्त्व अनेकदा जाणवतही नाही. मात्र भारताच्या भविष्याची दूरदृष्टी राखणाऱ्या नेत्यांना देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे हे स्पष्टपणे ठाऊक होते. देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा औद्योगिक क्रांतीचे पर्व सुरू होते. त्यातूनच तत्कालीन नेतृत्वाने वैज्ञानिक आणि संशोधन व विकास संस्था उभारण्यास सुरुवात केली. आपल्या वैज्ञानिकांनीही मर्यादित संसाधनांमध्ये उपलब्ध संधींचा पुरेपूर उपयोग करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक व्यासपीठावर भारताला नेले.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि आता इनोव्हेशन यांचाही आपल्या जीवनावर सातत्याने परिणाम होत आहे. आपण मान्य करो अथवा न करो, विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. सकाळी नाश्ता करण्यापासून ते रात्री ज्या गादीवर झोपतो या सगळ्यात विज्ञान आहे. आता तुम्ही म्हणाल की हे फक्त तंत्रज्ञान आहे. मात्र आपण हे जाणले पाहिजे की योग्य वैज्ञानिक आधाराशिवाय कोणत्याही तंत्रज्ञानाची निर्मिती होऊ शकत नाही. गेल्या काही शतकांत झालेल्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि ज्ञानाचा आपल्या जीवनशैली आणि स्वच्छतेच्या सवयींवरही मोठा परिणाम झाला आहे. यात जसे की हात धुण्याचे फायदे, सकस आहार घेणे, रोग व्यवस्थापन किंवा शरीराची स्वच्छता आदींचा समावेश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने निसर्गाच्या आकलनात क्रांतिकारी बदल घडवले आहेत. विज्ञान हे मानवी संस्कृतीसाठी अत्यावश्यक आहे याची आपण सतत लोकांना आठवण करून द्यायला हवी. यात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे विज्ञान आपोआप पुढे जात नाही.
नेहरू सायन्स सेंटरच्या माध्यमातून काय करतो
नेहरू सायन्स सेंटर १९८७ पासूनच राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने साजरा करते. या दिनाच्या निमित्ताने केंद्रात हँड्स-ऑन ॲक्टिव्हिटीज, विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा यामध्ये प्रश्नमंजूषा, ट्रेझर हंट, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, विज्ञानाधारित व्यंगचित्र स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले जाते. तसेच विज्ञान व्याख्याने, सजीव विज्ञान प्रात्यक्षिके, वैज्ञानिक खेळणी निर्मितीची कार्यशाळा, विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि सर्वसामान्य लोकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात.