‘उद्याचे वैज्ञानिक घडवा’
By Admin | Published: October 13, 2016 03:51 AM2016-10-13T03:51:01+5:302016-10-13T03:51:01+5:30
शाळेच्या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना स्वहस्ते प्रयोग करू द्या. त्यांना प्रोत्साहन द्या. त्यातूनच उद्याचे वैज्ञानिक आपल्या शाळेतून घडतील आणि याचा सार्थ अभिमान बाळगा, असा सल्ला डॉक्टर होमी भाभा मुंबई
ठाणे : शाळेच्या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना स्वहस्ते प्रयोग करू द्या. त्यांना प्रोत्साहन द्या. त्यातूनच उद्याचे वैज्ञानिक आपल्या शाळेतून घडतील आणि याचा सार्थ अभिमान बाळगा, असा सल्ला डॉक्टर होमी भाभा मुंबई विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संचालक आणि मो.ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी दिला.
मो.ह. विद्यालयाच्या गुरुवर्य स. वि. कुलकर्णी ग्रंथालय सभागृहात विज्ञानविषयक शिक्षकांसाठी मंगळवारी विज्ञान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यात जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सर्व ११ शाळांतील विज्ञान शिक्षकांसाठी हे शिबिर होते. या वेळी डॉ. प्रधान यांनी विज्ञानविषयक शिक्षकांचे प्रबोधन केले. ते पुढे म्हणाले की, विज्ञानामुळे जग बदलत आहे. विज्ञान हे प्रयोगशील असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताने प्रयोग करण्यासाठी त्यांच्यातील उत्सुकता जागृत करा. त्यांच्या संकल्पनांच्या उंचीचा वेध घ्या. कारण, स्वतंत्र प्रज्ञेची अभिव्यक्ती म्हणजे विज्ञान होय, अशा आश्वासक शब्दांत त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या वेळी ९० शिबिरार्थी सहभागी झाले होते. दुसऱ्या सत्रात डॉ. परेश जोशी, आनंद घैसास व प्रकाश नेवाळे यांनी सप्रयोग विज्ञानाची माहिती दिली. या प्रसंगी प्राचार्य राजेंद्र राजपूत. डॉ. सतीश वैद्य, संजय नलावडे, संदीप वैद्य व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)