विज्ञानच मानवाचे कल्याण करेल !
By admin | Published: January 4, 2015 02:23 AM2015-01-04T02:23:36+5:302015-01-04T02:23:36+5:30
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आता विकसित देशांच्या खाद्यांला खांदा लावून चमकदार कामगिरी करीत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात लाखमोलाची ताकद आहे.
मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आता विकसित देशांच्या खाद्यांला खांदा लावून चमकदार कामगिरी करीत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात लाखमोलाची ताकद आहे. युवा पिढीने त्याचे महत्त्व ओळखले असून, अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून युवा पिढी आणखी सशक्त होईल आणि हेच विज्ञान मानवाचे कल्याण करेल, असे उद्गार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काढले.
इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीएच्या मैदानात आयोजित ‘प्राइड आॅफ इंडिया’ या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन म्हणाले की, प्राइड आॅफ इंडियासारखी विज्ञान प्रदर्शने सर्वांच्याच ज्ञानात भर घालत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आज मोठी प्रगती केली असून, यात भारतही मागे राहिलेला नाही. जागतिक स्तरावर इतर देशांच्या तुलनेत गेल्या काही वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपल्याकडील शास्त्रज्ञ देशाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना लाखमोलाचे धडे मिळतील.
आणि हेच प्रदर्शन युवा पिढीतून आणखी शास्त्रज्ञ निर्माण करतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गती
पाहता भारतीयांनी त्यांची कास धरायला हवी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
दरम्यान, रघुनाथ माशेलकर, राजन वेळुकर, हर्षवर्धन, विनोद तावडे, रवींद्र वायकर यांनी विज्ञान प्रदर्शनातील स्टॉलची आवर्जून पाहणी केली. विशेषत: इस्रो आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थांनी उभारलेल्या स्टॉलला मान्यवरांनी भेटी देत माहिती घेतली. (प्रतिनिधी)