Join us

"शास्त्रज्ञांना भेटायला हवं, पण मोदींचा रोड शो कशासाठी?"; काँग्रेसचा थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:45 AM

चंद्रयान २ मोहिमेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. बंगळुरूच्या इस्रोच्या कार्यालयात लाईव्ह पाहत होते.

मुंबई/बंगळुरू - चंद्रयान ३ मोहिमेवरून जगभरात इस्रोची वाहवा होत आहे. विक्रम रोलरच्या लँडींगवेळी मोदी ब्रिक्स शिखर बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला होते. त्यामुळे ते चंद्रयान ३ मोहिमेच्या यशावेळी उपस्थित राहू शकले नव्हते. या दौऱ्यावरून मोदी आज भारतात परतले. मोदींनी दिल्लीला न जाता थेट बंगळुरू गाठले. यावेळी, बंगरुळूत मोदींचा रोड शो ही करण्यात आला. त्यावरुन, आता विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी शास्त्रज्ञांना जरुर भेटावे, पण रोड शो कशासाठी केला? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.  

चंद्रयान २ मोहिमेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. बंगळुरूच्या इस्रोच्या कार्यालयात लाईव्ह पाहत होते. परंतू, तेव्हा चंद्रयान २ चे लँडिंग अपयशी झाले होते. 

बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले. त्यानंतर मोदींनी तिथे स्वागतासाठी जमलेल्या लोकांना संबोधित केले. पंतप्रधानांनी जय जवान, जय किसान, जय अनुसंधानचा नारा दिला. येथून पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात चांद्रयान-३ पाठवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला भेटण्यासाठी निघाले. यावेळी, रस्त्यावरुन जाताना मोदींनी सर्वांना हात दाखवून अभिवादन केले. म्हणजेच मोदींचा रोड शो बंगरुळुत झाला. त्यावरुन, काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. शास्त्रज्ञांचं कौतुक करायला आणि भेट घ्यायला त्यांनी गेलंच पाहिजे. मात्र, जाताना बंगळुरुत रोड शो करण्याची काय गरज, रोड शो कशासाठी?. मग, त्यांच्या रोडमध्ये शास्त्रज्ञ का नाहीत, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी विचारला आहे. आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. मात्र, चंद्रयान मोहिमेच्या यशावरुन मोदींकडून राजकारण करण्यात येत असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. 

एस. सोमनाथ यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देण्यात आली. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींना संपूर्ण मिशनची माहिती दिली. चांद्रयान-३ च्या लँडिंगवेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्या यशाकडे होते. मी तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. मला तुम्हा सर्वांना बघायचे होते. मी तुम्हा सर्वांना सलाम करू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. 

टॅग्स :नरेंद्र मोदीबेंगळूरकाँग्रेसइस्रोचंद्रयान-3