‘एलिव्हेटेड’ला कात्री!

By Admin | Published: March 31, 2016 02:36 AM2016-03-31T02:36:43+5:302016-03-31T02:36:43+5:30

बहुचर्चित चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला अखेर कात्री लावण्यात आली असून, हा एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी नवीन अभ्यास अहवालही तयार

Scissor to 'elevated' | ‘एलिव्हेटेड’ला कात्री!

‘एलिव्हेटेड’ला कात्री!

googlenewsNext

मुंबई : बहुचर्चित चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला अखेर कात्री लावण्यात आली असून, हा एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी नवीन अभ्यास अहवालही तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (एमआरव्हीसी) देण्यात आली. या प्रकल्पासाठी राज्य सहकार्य करार आवश्यक असून त्यासाठी बोलणी सुरू असल्याचे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.
एलिव्हेटेड प्रकल्प वांद्रे, अंधेरी किंवा बोरीवलीपासून विरारपर्यंत करण्यासाठी चाचपणी करण्यात आली आणि एमआरव्हीसीने त्यावर काम करण्यास सुरुवात केली. अखेर हा प्रकल्प अंधेरीपासूनच करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. याबाबत प्रभात सहाय यांनी सांगितले की, एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी
किंवा वांद्रेपासून पुढे सरकवण्याचा विचार केला जात आहे. परंतु एमआरव्हीसीने केलेल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार अंधेरीपासूनच एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सहकार्य करार होणे अपेक्षित असून त्यासाठी शासनाशी बोलणी सुरू असल्याची माहिती सहाय यांनी दिली. प्रकल्पाचे काम हे पीपीपीनुसार पूर्ण करण्यात येणार आहे.

चर्चगेट-विरारमध्ये
अनेक अडथळे
गेल्या तीन वर्षांपेक्षाही जास्त काळापासून चर्चेत असलेला ओव्हल मैदान ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प पश्चिम रेल्वेकडून पूर्ण केला जाणार होता. त्यासाठी सर्व्हेही करण्यात आला.
परंतु ओव्हल मैदानाची काही जागा प्रकल्पात जाणार असल्याने त्याला विरोध झाला आणि एलिव्हेटेड प्रकल्प चर्चगेट ते विरार करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकल्पासाठी जवळपास २५ हजार कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला. या प्रकल्पात २६ स्थानके होती. काही स्थानके एलिव्हेटेड, काही स्थानके भूमिगत तर काही समांतर स्थानके होती.
मात्र एलिव्हेटेड प्रकल्पामुळे त्याला समांतर असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाला बसणारा फटका आणि एलिव्हेटेड प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता पाहता प्रकल्पाला कात्री लावण्यासाठी खुद्द शासनाकडूनच रेल्वेकडे मागणी करण्यात आली. यात शासन आणि रेल्वेत वाद वाढत गेला आणि त्यामुळे प्रकल्प रखडत गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले होते. आता मात्र एमआरव्हीसीकडून ही बाब स्पष्ट करण्यात आली.

Web Title: Scissor to 'elevated'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.