Join us

क्रेडिट कार्ड धारकांच्या खर्चाला बँकांकडून कात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 6:45 PM

क्रेडिट मर्यादा ४० ते ९० टक्क्यांनी कमी; कोरोना संकटामुळे परतावा न मिळण्याची बँकांना भीती  

 

संदीप शिंदे

मुंबई - कोरोना संकटामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय बंद झाला आहे. गेल्या दीड महिन्यांत एक रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे या महिन्यातील बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड कामी येईल असा व्यावसायिक संदीप वेंगुर्लेकर यांचा विचार होता. मात्र, बँकेने त्यांच्या क्रेडिटची मर्यादा मासिक दीड लाख रूपयांवरून थेट सात हजार रुपये करून मोठा धक्का दिला आहे. जेव्हा सर्वाधिक गरज आहे तेव्हाच लावलेल्या या कात्रीमुळे केवळ वेंगुर्लेकरच नव्हे तर विवध बँकांचे हजारो क्रेडिट कार्ड धारक चक्रावले आहेत.

मला बँकेने एक लाख रुपयांपर्यंत मर्यादा दिली होती. ती आता ३० हजार रुपये झाल्याचा मेसेज मोबाईलवर आल्याचे विनीत मयेकर यांनी सांगितले. तर, ८० हजारांपर्यंत क्रेडिट मर्यादा असलेल्या शितल म्हात्रे यांना आता फक्त १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्याची मुभा आहे. कोरोना संकटामुळे प्रत्येकाच्याच खिशाला झळ बसली आहे. अनेकांनी नोकरी गमावली आहे. वेतन कपातीचा फटका जवळपास प्रत्येकालाच बसणार आहे. त्याशिवाय सर्वच प्रकारचे उद्योजक आणि व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहे. या आर्थिक अरिष्टाच्या काळात पैशांची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. परंतु, या खर्च केलेल्या पैशांचा परतावा मासिक तत्वावर ग्राहकांकडून येईलच याची शाश्वती अनेक बँकांना नाही. त्यामुळे ज्या बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांनी कोणताही धोक न पत्करता आपल्या ग्राहकांच्या क्रेडिट मर्यादेत कपात करण्याचा निर्णय सुरवातीला घेतला. १५ एप्रिल पासून त्यांनी ही कपात लागू केली. त्यात माजी सरकारने कृपाछत्र धरल्याने वादग्रस्त ठरलेल्या बँकेसह आणखी एका बँकेचा समावेश होता. आता कोरोना संकटामुळे कोसळणा-या आर्थिक संकटाची धार अधिक वाढत असल्याने आणखी काही बँकांनी क्रेडिटला कात्री लावण्यास सुरूवात केली आहे. ही कात्री ४० ते ९० टक्क्यांपर्यंत असल्याच्या वृत्ताला दोन बँकांच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला आहे. मात्र, बँकेसह स्वतःचे नावही प्रसिध्द करण्यास त्यांनी नकार दिला. 

---- ----------------------------

ग्राहकांच्या अडचणीत भर

अनेकांची महावितरण, सोसायटी मेंटेनन्स, महानगर गँस आदींची मासिक बिले क्रेडिट कार्डच्या माध्यमातून इलेक्ट्राँनीक क्लिअरिंग सिस्टिमव्दारे ईसीएसव्दारे अदा होतात. क्रेडिट मर्यादा कमी केल्याने ती बाऊस झाली आहेत. आता त्या पोटीचा भुर्दंडही सोसावा लागणार आहे. लाँकडाऊनमुळे बँकांची कस्टमर केअर सेंटर्स बंद आहेत. त्यामुळे क्रेडिट मर्यादा का कमी केली याबाबतचे कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याची या ग्राहकांची तक्रार आहे. वेंगुर्लेकर यांनी बराच प्रयत्न केल्यानंतर बँकेच्या हे धोरणानुसार मर्यादा कमी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे सबळ कारण देण्यास बँकेच्या रिलेशनशीप मँनेजरने असमर्थता दर्शवल्याचेही वेंगुर्लेकर म्हणाले.  

 

टॅग्स :पैसाकोरोना वायरस बातम्या