अनावश्यक कामांना कात्री ,पालिकेने वाचवले कोट्यवधी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 07:05 AM2017-12-10T07:05:20+5:302017-12-10T07:05:36+5:30
ठेकेदारांची तुंबडी भरण्यासाठी रस्ते व पर्जन्य जलवाहिन्यांच्या विभागात काही अनावश्यक कामे सुरू असल्याची धक्कादायक प्रकरणे उघड झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठेकेदारांची तुंबडी भरण्यासाठी रस्ते व पर्जन्य जलवाहिन्यांच्या विभागात काही अनावश्यक कामे सुरू असल्याची धक्कादायक प्रकरणे उघड झाली आहेत. छोट्या दुरुस्तीवर भागत असताना रस्ते खोदून ठेवण्याचे प्रकार अनेक वेळा होत आहेत. असे काही घोटाळे समोर आल्यानंतर अशा अनावश्यक कामांना कात्री लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पर्जन्य जलवाहिन्या व रस्त्यांची अनावश्यक कामे रद्द केल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपये ठेकेदारांच्या खिशात जाण्यापासून वाचले आहेत.
पालिका आयुक्त अजय मेहता यांच्यामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मासिक आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीत ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. कुलाबा, फ्लोरा फाउंटन येथे रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र तेथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता गृहीत धरून पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
प्रत्यक्षात या ठिकाणी पाणी तुंबत नाही. तरीही कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ पी. रामचंदानी मार्ग, फ्लोरा फाउंटन परिसर, मुंबई उच्च न्यायालय परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग या ठिकाणी मोठ्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे समोर आले आहे. ही सर्व कामे आता रद्द करण्यात आली आहेत.
असेच काही मुख्य रस्त्यांची अनावश्यक पुनर्बांधणी रद्द करून आता त्या रस्त्यांचे केवळ पुनर्पृष्ठीकरण केले जाणार आहे. यामुळे सुमारे पन्नास कोटी रुपयांची बचत होणार आहे.
रस्ते खात्यात पुन्हा घोटाळा
पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या सर्व कामांची चौकशी करून अनावश्यक कामांना कात्री लावली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आवश्यकता नसताना रस्त्यांची पुनर्बांधणी केली जात असल्याचे समोर आले. रस्ते उखडले असतील, त्याचा पाया कमकुवत झाला असेल, तरच त्या रस्त्याची पुनर्बांधणी केली जाते. मात्र अशी कोणतीच परिस्थिती नसताना रस्त्यांची कामे करून पालिकेला करोडो रुपयांचा चुना लावण्याचा घाट होता.
या रस्त्यांचे आता पुनर्पृष्ठीकरण
रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाला केवळ दहा दिवस लागतात. तर काँक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटतो. अशा अनावश्यक कामांमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशी काही कामे रद्द करून के.बी. पाटील मार्ग, ए.एस. डिमेलो मार्ग आणि पी. रामचंदानी मार्गाचे आता केवळ पुनर्पृष्ठीकरण होणार आहे. तर काही रस्ते चांगल्या स्थितीत असताना त्यावर सुचविलेले काम प्रशासनाने रद्द केले असल्याचे सूत्रांकडून समजते.