पालिका : उतारावर बसविणार धातूची जाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुसळधार पावसामुळे चार महिन्यांपूर्वी खचलेली मलबार टेकडी धोकादायक झाली आहे. त्यामुळे टेकडीचा परिसर सुरक्षित करण्यासाठी स्थापत्य तज्ज्ञांच्या समितीने काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या असून त्यानुसार पालिकेकडून ‘नेेल टेक्नॉलॉजी’द्वारे टेकडीचा परिसर सुरक्षित केला जाणार आहे. रस्ते दुरुस्ती आणि टेकडीच्या कामासाठी ५० कोटी रुपयेेे खर्च केले जाणार आहेत.
५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने मलबार टेकडीचा मोठा भाग खचला होता. एन. एस. पाटकर मार्गापासून ही टेकडी खचल्याने माती-झाडांचा ढिगारा बी. जे. खेर मार्गावर आला आणि रस्ता खचला. ही टेकडी सुरक्षित करण्यासाठी पालिकेने आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डी. एन. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली. या समितीने शास्त्रोक्त अभ्यास करून नेल टेक्नॉलॉजी पद्धतीने टेकडी मजबूत करण्याची शिफारस केली. समितीच्या सूचनेनुसार बी. जे. खेर मार्ग आणि एन. एस. पाटकर मार्गाच्या दुरुस्तीचे कामही पालिकेने हाती घेतले आहे.
टेकडीच्या मजबुतीची पाच वर्षांची हमी काम करणाऱ्या ठेकेदाराकडून घेण्यात येईल. यामध्ये काँक्रिटची संरक्षक भिंत, उतार स्थिर करणे अशा कामांसाठी पाच वर्षांची हमी असेल. ‘नेल टेक्नॉलॉजी’ म्हणजे उतारावरील मातीत स्टीलचे रॉड लावून उतारावर धातूची जाळी लावण्यात येईल. पावसाळा वगळता सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
* सल्ला घेेण्यासाठी माेजावे लागणार सव्वा कोटी
मलबार टेकडीची मजबुती आणि रस्त्याच्या बांधकामासाठी पालिकेने आठ तज्ज्ञांची नियुक्ती केली हाेती. यापैकी चार सदस्य बाहेरील असल्याने त्यांच्या शुल्कापोटी ४५ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर पालिकेने या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून स्ट्रक्टव्हेल डिझायनर्स ॲण्ड कन्सल्टंट या कंपनीची नियुक्ती केली होती. या सल्लागाराला ८१ लाख सहा हजार रुपये शुल्क दिले जाणार आहे.