राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाटकाचा आस्वाद घेताना रसिकजनांच्या दृष्टीस केवळ रंगमंचावरील कलाकार पडत असले, तरी त्यामागचे खरे नाट्य रंगमंचाच्या मागे घडत असते. रंगमंचाच्या या मागच्या बाजूची जबाबदारी बॅकस्टेज कर्मचारी, अर्थात पडद्यामागील कलावंत घेत असतात. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे बॅकस्टेज कलावंत, बुकिंग क्लार्क, व्यवस्थापक आदी नाट्यक्षेत्राशी संबंधित मंडळींचे कंबरडे पार मोडले होते. आताही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृहे पुन्हा बंद झाली आहेत. परिणामी, पडद्यामागील या कलावंतांच्या एकूणच जगण्यावर पुन्हा एकदा पडदा पडला आहे.
यंदा एप्रिलच्या १४ तारखेपासून नाट्यगृहे बंद झाली आणि केवळ नाटकांवरच उपजीविका असणाऱ्या पडद्यामागील कलावंतांपुढे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पडद्यामागील कलावंतांसमोर चरितार्थाचा प्रश्न आता नव्याने ठाण मांडून उभा राहिला आहे. गेल्या वर्षी अनेक संस्था आणि व्यक्तींनी या मंडळींना मदत केली असली, तरी सध्या मात्र मदतीचा ओघ आटल्याचे दिसून येत आहे. कदाचित, सध्याच्या निर्णयानुसार तूर्तास केवळ १५ दिवसच निर्बंध असल्याने मदतीसाठी फारसे कुणी पुढे सरसावल्याचे आढळून येत नाही. आता नाट्यगृहे पुन्हा कधी सुरू होतील, याकडे पडद्यामागील कलावंतांचे लक्ष लागून राहिले असून; कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात येवो आणि सध्याचे निर्बंध लवकर संपुष्टात येवोत, अशीच या मंडळींची भावना आहे.
* दैनंदिन जीवनावर परिणाम
केवळ नाट्य व्यवसायावरच आमचे पोट अवलंबून आहे, आम्ही इतरत्र कुठेही नोकरी वगैरे करीत नाही. त्यामुळे नाट्यगृह बंद झाल्यापासून पुढे करायचे काय, हा प्रश्न पडला आहे. आता कुठे नाट्यगृहे सुरू झाली होती आणि हळूहळू प्रेक्षक नाटकाला गर्दी करू लागले होते. परंतु पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आणि नाट्यगृहे बंद झाली. त्यामुळे आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. इतर काही क्षेत्रांतील लोकांप्रमाणेच आमच्यासाठीही काही पॅकेज वगैरे जाहीर झाले, तर आम्हाला समाधान वाटेल.
- हरी पाटणकर,
बुकिंग व्यवस्थापक
* उपासमारीची भीती
मागच्या लॉकडाऊनच्या काळानंतर नाट्यगृहे आता पुन्हा सुरू झाली होती. त्यामुळे असे वाटले की, नाट्यक्षेत्र पुन्हा एकदा नव्याने उभे राहू लागले आहे. पण, पुन्हा कोरोनाचे संकट आले आणि आम्ही सर्व जण पुन्हा संकटात सापडलो. सध्याच्या काळात नक्की काय करावे ते सुचत नाही. नाट्यगृहे बंद झाल्याने परत उपासमारीची भीती वाटू लागली आहे. आम्हा कलावंतांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. कोरोनाचे संकट संपले की मी आणि आमची सगळी टीम परत त्याच जोमाने रंगभूमीवर उत्साहाने कामाला लागू.
- विलास दाते,
नाट्य व्यवस्थापक
------------------------