‘संता बंता’वर पडदा
By admin | Published: April 23, 2016 02:27 AM2016-04-23T02:27:47+5:302016-04-23T02:27:47+5:30
संता बंता प्रा. लि. या चित्रपटामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावतील असे म्हणत पंजाबी कल्चरल हेरिटेज बोर्डाचे (पीसीएचबी) अध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुंबई : संता बंता प्रा. लि. या चित्रपटामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावतील असे म्हणत पंजाबी कल्चरल हेरिटेज बोर्डाचे (पीसीएचबी) अध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या चित्रपटाचा पहिला खेळ झाला. दरम्यान, सप्रा यांच्या नेतृत्वाखाली शीख समुदायाने या विरोधात आवाज उठविल्याने दुसऱ्या खेळापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात आले.
‘संता बंता प्रा.लि’ या सिनेमाचे पोस्टर्स आणि टे्रलरमध्ये शीख समुदायाचा पेहराव, बोली भाषा तसेच अश्लील विनोद दाखवून शीख समुदायाचा अपमान केला जात असल्याचा आरोप पीसीएचबीने केली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी गुरुद्वाराच्या प्रमुखांना दाखवण्यात यावा, असे सप्रा यांनी सांगितले. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून सप्रा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी या चित्रपटाचा पहिला खेळ झाला.
या प्रदर्शनामुळे शीख समुदायाच्या भावना भडकल्याने सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले आणि देशभरातही याचे पडसाद उमटले. त्यामुळे देशभरात दुसऱ्या खेळापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात आले. सप्रा आणि पीव्हीआरच्या प्रमुखांच्या झालेल्या बैठकीत पीव्हीआरच्या ८० स्क्रीनवरील चित्रपट रद्द करण्यात आले. त्यात शनिवारी देशभरातील शीख बांधवांनी एकत्र येऊन चित्रपट निर्मात्यांसह कलाकार आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन सप्रा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)