Join us

बालजलतरणपटूचा पुन्हा विक्रम

By admin | Published: April 28, 2015 10:33 PM

संतोष पाटील याने धरमतर (पेण) ते गेट वे आॅफ इंडिया हे सागरी ३६ किमी अंतर सलग १२ तास ११ मिनिटांत पोहून पार केले.

जयंत धुळप- अलिबागउरण तालुक्यातील करंजा येथील राष्ट्रीय आयुध आगार (एनएडी) केंद्रीय विद्यालयात पाचवीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या राज संतोष पाटील याने धरमतर (पेण) ते गेट वे आॅफ इंडिया हे सागरी ३६ किमी अंतर सलग १२ तास ११ मिनिटांत पोहून पार केले. हा विक्रम करणारा राज हा देशातील सर्वात लहान बालजलतरणपटू असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अपंग जलतरणपटू विज्ञान मोकल यांनी दिली.बुधवारी मध्यरात्री पेण तालुक्यातील धरमतर येथे राजने सागरात धाडसी झेप घेतली, मात्र पाऊस सुरू झाल्याने त्याचा प्रवास खडतर झाला. राजसोबत चार बोटींतून प्रोत्साहन देण्यासाठी असलेले त्याचे वडील जलतरणपटू संतोष पाटील, आंतरराष्ट्रीय अपंग जलतरणपटू विज्ञान मोकल आदींच्या पोटात भितीचा गोळाच आला. पावसामुळे व्हिजिबिलीटीही कमी झाली होती. मात्र राजने जिद्दीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन तासांनी पाऊस थांबला आणि सर्वांना हायसे वाटले. सागरी ३६ किमी अंतरापैकी पहिले २६ किमी अंतर राजने सहा तासांत कापले आणि पुन्हा वातावरण बदलले आणि वादळी वाऱ्यास प्रारंभ झाला. राजसोबतच्या चार बोटीही हेलकावू लागल्या, मात्र राज हटला नाही. ३६ पैकी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील सागरी १० किमीच्या अंतरात राजला प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते.विक्रमावर विक्रमच्गेल्या १० एप्रिल रोजी वाशी पूल ते गेटवे आॅफ इंडिया हे सागरी २६ किमी अंतर राजने ६ तास २४ मिनिटे आणि २१ सेकंद अशा विक्रमी वेळेत पार केले, त्यानंतर बारा दिवसांतच राजने बुधवारी धरमतरच्या समुद्रात झेप घेऊन हा दुसरा विक्रम केला आहे.जिद्दीला सॅल्युटच्राजच्या या विक्रमाची नोंद घेऊन महाराष्ट्र जलतरण संघटनेचे प्रभारी व निरीक्षक सुबोध सुळे, आर.एन.शिपिंगचे व्यवस्थापकीय संचालक रवी नारायण कोळी, जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील उपस्थित होते. वाशी पूल ते गेटवे २६ किमी सागरी अंतर विक्रमी वेळेत पार केल्याने राजचा आत्मविश्वास वाढला आणि अवघ्या बारा दिवसांनी त्याने धरमतर ते गेटवे ३६ किमी सागरी अंतराचा पल्ला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार केला आणि त्याने आपल्या अनन्यसाधारण जिद्दीचीच प्रचिती सर्वांना करून दिली आहे.- संतोष पाटील, राजचे वडील