पालिका दवाखान्यात मानसिक आजाराची तपासणी; ३५० डॉक्टरांना दिले प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:21 PM2023-03-28T13:21:40+5:302023-03-28T13:25:01+5:30
गेल्या काही महिन्यांत मानसिक आरोग्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या १९१ दवाखान्यांत एप्रिल महिन्यापासून तेथे येणाऱ्या रुग्णांची मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वसाधारण ३५० डॉक्टरांना याबाबतचे एका महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या कामात मदत करण्यासाठी दोन मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत मानसिक आरोग्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांचा ताण दिसत असून या अशा परिस्थतीत त्यांना वेळेवर मदत मिळणे गरजेचे आहे. या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांना पुढील उपचाराकरिता के. इ. एम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील मानसोपचार विभागात पाठवून देण्यात येईल.
या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मानसिक आरोग्य तपासणीच्या उपक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील दवाखान्यात काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना बंगळुरू येथील मानसोपचार विषयातील प्रख्यात निमहांस या संस्थेतर्फे ऑनलाइन एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे राज्याच्या सार्वजनिक विभागातील अधिकारी आणि महापालिकेच्या महाविद्यालयातील मानसोपचारतज्ज्ञांमार्फत या विषयावरील सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग म्हणून महापालिकेचा हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व दवाखान्यांत या उपक्रमाची जाहिरात केली जाणार असून मानसिक आरोग्य बाबतीतील जनजागृतीसाठी आवश्यक असणारी भित्तिपत्रके लावण्यात येणार आहेत.