जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांर्तगत राज्यात ८५ लाखांहून अधिक बालकांची तपासणी

By स्नेहा मोरे | Published: March 2, 2023 06:42 PM2023-03-02T18:42:53+5:302023-03-02T18:43:11+5:30

राज्यभरात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक पथके कार्यरत आहेत.

Screening of more than 85 lakh children in the state under Vigilant Parents Healthy Child Mission | जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांर्तगत राज्यात ८५ लाखांहून अधिक बालकांची तपासणी

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांर्तगत राज्यात ८५ लाखांहून अधिक बालकांची तपासणी

googlenewsNext

मुंबई : राज्यात राबविण्यात येणाऱ्या जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत ८५ लाख १८ हजार ८८९ बालकांची तपासणी करण्यात आली आहे, याकरिता राज्यभरात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक पथके कार्यरत आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ६८६ शाळा व ३७ हजार ४४८ अंगणवाडी मध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यामधील ८१,१८,८८९ एकूण बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये नवजात बालक ते सहा वर्षांपर्यंतच्या १८ लाख ९८ हजार ३९० , सहा ते १० वर्षांपर्यंतच्या २८ लाख ७२ हजार ७२४ आणि १० ते १८ वर्षांपर्यंतच्या ३७ लाख ४७ हजार ७७५ बालकांचा समावेश आहे. यात ६ लाख ८४ हजार १४५ बालके विविध समस्यांनी आजारी आढळली आहेत. त्यातील ५ लाख ३६४ बालकांवर त्वरित उपचार करण्यात आले आहेत, तर २ लाख २३ हजार ६२९ बालकांना अन्य उपचारांकरिता संदर्भित करण्यात आले आहे.

वैद्यकीय पथकांमार्फत नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, अपस्मार इ. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित संदर्भित करणे,तसेच, स्वमग्नता, विकासात्मक विलंब इ. च्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित डीआईसी येथे उपचार थेरपी करिता संदर्भित करण्यात येत आहे. किशोरवयीन मुले-मुलींमधील शारीरिक मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार पुरविण्यात येत आहेत. उपचाराकरिता संदर्भित केलेल्या बालकांना आवश्यकतेनुसार विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निदान, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. तसेच विशेष मोठ्या शस्त्रक्रिया या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आणि खासगी रुग्णालयामधून करण्यात येत आहेत.

लवकर निदानामुळे नियंत्रण शक्य
अभियानात नवजात बालकांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमधील आरोग्यविषयक समस्या आणि आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. या माध्यमातून दिवसभरात सुमारे १००- १५० बालकांच्या तपासणीचे उद्दिष्ट आहे. आजारांचे लवकर निदान झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, त्यामुळे या अभियानात अधिकाधिक बालकांच्या तपासण्या होणे गरजेचे आहे. यात न्युमोनिया,जंतुसंसर्ग, अतिसार, रक्तक्षय, दृष्टिदोष, दंतविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, इ. व्याधींने आजारी असलेल्या बालकांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच, नवजात बालकासोबत आलेल्या मातेस आणि ६ ते १८ वयोगटाकरिता स्तनपान, पोषण, बीएमआय मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती संदर्भात समुपदेशन करण्यात येत आहे.
डॉ. अनिता पोयरेकर, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Screening of more than 85 lakh children in the state under Vigilant Parents Healthy Child Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य