Join us

विजयादशमीनंतर बंद होणार 'रवींद्र'चा पडदा

By संजय घावरे | Published: October 19, 2023 7:59 PM

१७ सप्टेंबर २००२ पासून रसिकांच्या सेवेत असलेले रवींद्र नाट्य मंदिर विजयादशमीनंतर म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे.

मुंबई - १७ सप्टेंबर २००२ पासून रसिकांच्या सेवेत असलेले रवींद्र नाट्य मंदिर विजयादशमीनंतर म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे. ८ मार्च २०२४ रोजी अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज नाट्यगृह रंगकर्मी आणि रसिकांच्या सेवेत खुले करण्याची पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची योजना आहे.

मागील बऱ्याच वर्षांपासून नाट्यरसिकांच्या सेवेत असलेले प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर नाट्यगृह काही दिवसांपासून विविध समस्यांच्या विळख्यात अडकले होते. त्या दूर करण्यासाठी नाट्यगृहासोबत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत महिन्याभरापासून अकादमीच्या इमारतीच्या एका बाजूच्या दुरुस्तीसह पार्किंग तसेच आवारातील हॉटेलचे काम सुरू आहे. आता मुख्य नाट्यगृह आणि मिनी थिएटरसह मोठे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या की, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्यासोबत बैठका सुरू असून, कंत्राट मंजूर झाले असल्यास २५ ऑक्टोबरपासून नाटयगृह बंद राहील.

 सध्या मिनी थिएटरचे काम सुरू आहे. काही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड असल्याने एकाच वेळी सर्व बंद करून काम करावे लागणार आहे. यामध्ये मुख्य नाट्यगृहासोबत मिनी थिएटर, सर्व हॉल्सचे नूतनीकरण केले जाईल. तूर्तास ८ मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे, पण उशीरा उशीरा ३१ मार्चपर्यंत नाट्यगृह खुले करण्यात येईल. सोयीसुविधांनी सुसज्ज नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे. हि अकादमी संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ बनावी आणि कलांची पंढरी म्हणून नावारूपाला यावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागचे प्रधान सचिव विकास खारगेंपासून सर्वांचेच प्रयत्न असल्याचेही जोगळेकर म्हणाल्या. तारखांचा तिढा नाही...नूतनीकरण करणार असल्याचे नाट्यक्षेत्रातील बऱ्याच लोकांना अगोदरच सांगितल्याने तारखा बुक केलेल्या नाहीत. त्यामुळे तारखा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. टेंडर निश्चित झाले नसेल तर ३१ ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरू राहील. हे सुरू राहील...या काळात अकादमीचे कार्यालय आणि कलांगण सुरू राहणार आहे. इथे कलाकारांना खुल्या मंचावर कार्यक्रम सादर करता येतील. त्यामुळे नाट्यगृह आणि मिनी थिएटर बंद असले तरी कलांगणात काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ही कामे होतील...पीडब्ल्यूडीने नाट्यक्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. त्यानुसार अॅकॉस्टिक, विंग्ज, खुर्च्या, व्हीआयपी रुम, मेकअप रुम, प्रसाधनगृहे, पाणीगळती आदी कामे केली जाणार आहेत. वातानुकूलीत यंत्रणेसह सांडपाण्याची यंत्रणाही बदलण्यात येईल. 

टॅग्स :मुंबई