मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यातील फरक, त्याचप्रमाणे शहर-उपनगरातील वाढते धूरके आणि धूलिकण यांमुळे मुंबईकरांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. या बदलत्या वातावरणामुळे नाक, घसा, त्वचा आणि डोळ्यांचे विकार उद्भवत आहेत. हवामानातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. या विषमतेमुळे व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांसोबतच अन्य काही साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.दिवसा प्रखर सूर्यकिरणांमुळे पृष्ठभाग तापून हवामानातील उष्णताही वाढते. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक दिसून येत आहे. हवामानातील हे बदल उपरोक्त आजारांना कारणीभूत ठरत असून प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना याची लागण पटकन होते, अशी माहिती डॉ. राजेंद्र सुखासे यांनी दिली. शहरात अॅलर्जीचेही रुग्ण वाढले आहेत. धुळीमुळे सर्दी, नाक वाहणे, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. खाजगी दवाखान्यांमध्ये सर्दी-खोकला, अंगदुखी, त्वचाविकार अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. दुपारी जाणवणारे उन्हं, दिवसभरातील धूरक्याचे स्तर यामुळे घशाचे विकारही होताना दिसत आहेत. या हवामान बदलामुळे साथीचा ताप येण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सतत धूळ व धूरक्याच्या ठिकाणी वावर असेल तर रुग्णांना दम्याचा धोका संभवतो. त्यामुळे धुळीसोबत मातीतील जंतू नाका-तोंडात जाऊन डोळ्यांत जळजळ, घसा दुखणे, नाक वाहणे, खोकला, हृदयविकार असा त्रास जाणवतो. त्यामुळे अशा ठिकाणी वावरताना तोंडाला रुमाल बांधणे, अंग झाकणे असे उपाय अवलंबिले पाहिजेत. तसेच डोळे चुरचुरणे, डोळा लाल होणे, खाज येणे, डोळे कोरडे पडणे, टोचल्यासारखे वाटणे, जळजळ होणे आदी समस्यांनी ग्रस्त असलेले रुग्णही आहेत.- डॉ. सागर सोनावणे
आॅक्टोबर हीटमुळे अाजारांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 6:05 AM