Join us

वाघनखांवरून ‘ओरखडे’... संशयकल्लोळ, लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 5:04 AM

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनच्या म्युझियममधील वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचा करार करण्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत.

मुंबई : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनच्या म्युझियममधील वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचा करार करण्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. मात्र, आता ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच  आहेत का, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केल्याने राजकारण तापले आहे. वाघनखे खरी असतील तर पुरावे द्या, या त्यांच्या आव्हानाला वाघनखे खोटी आहेत हे सिद्धच करा, असे प्रतिआव्हान शिवरायांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहे.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून वाघनखे आणण्यासाठी मंत्री मुनगंटीवार ३ ऑक्टोबर रोजी करार करणार आहेत. रविवारी रात्री ते लंडनला रवानादेखील झाले. मात्र, यावरून महाराष्ट्रात मात्र राजकीय ओरखडे ओढले जात आहेत.

इतिहासात काय?

काही इतिहास अभ्यासकांकडून वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का, हा उपस्थित केलेला मुद्दा विरोधी पक्षातील आमदार आदित्य ठाकरे यांनी उचलून धरला. यावर सत्ताधारी आमदार, खासदारांकडून आदित्य यांचा समाचार घेण्यात आला.

शिवराय हे महाराष्ट्रासाठी दैवत आहेत. त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची वस्तू महाराष्ट्रात येत असेल, तर त्याचे मंदिर व्हावे आणि त्याचे जतन व्हावे, अशी शिवभक्तांची भावना आहे. मात्र, सरकारने जनतेच्या भावनांशी खेळू नये. वाघनखे खरी असतील तर पुरावे द्या, जे काय असेल ते लोकांसमोर स्पष्ट करावे.      

- आदित्य ठाकरे, आमदार, ठाकरे गट

खरी आहेत का, हे विचारण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनी वाघनखे खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवावे. ज्या गोष्टींशी मराठी माणसांची अस्मिता जोडली गेली आहे, त्याचे राजकारण न करता वाघनखांचे पूजन करावे, दर्शन घ्यावे.       - शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

वाद निर्माण करण्यात अर्थ नाही : शरद पवार

शिवरायांच्या वाघनखांवरून वाद निर्माण करावा, असे मला वाटत नाही. मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार इंद्रजीत सावंत आहेत. त्यांचे काही मत असेल, तर त्याचा विचार केला पाहिजे; पण वाघनखांविषयी मला प्रत्यक्ष काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.    

बालबुद्धीला उत्तर देत नाही : देवेंद्र फडणवीस

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडेच पुरावे मागितले होते. त्यामुळे मला याचे आश्चर्य वाटत नाही. ती त्यांची परंपरा आहे. मी बालबुद्धीला उत्तर देत नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :आदित्य ठाकरेछत्रपती शिवाजी महाराज