Join us

गणेशमूर्तींचे महापुरात नुकसान झाले आहे त्या मूर्तिकारांना मिळणार मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:07 AM

मुंबई : संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडपले असून, महापुराने येथील जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील ...

मुंबई : संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडपले असून, महापुराने येथील जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचेदेखील मोठे नुकसान झाले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी ज्यांच्या मातीच्या गणेशमूर्तीचे महापुरात नुकसान झाले आहे त्या मूर्तिकारांना मूर्ती दिल्या जातील, अशी माहिती श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेने दिली. पहिल्या टप्प्यात कोकणातील गणेश मूर्तिकारांना मदत केली जाईल आणि आम्ही यास एका प्रकारची सेवा समजत आहोत, असेही श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेकडून सांगण्यात आले.

श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेने मुंबई आणि उपनगरांमधील सर्व गणेश मूर्तिकारांना आवाहन केले आहे. यानुसार, मागील काही दिवसांत महाराष्ट्र राज्यामधील कोकण, महाड, चिपळूण भागांमध्ये अतिवृष्टी होऊन तेथील मूर्तिकारांचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान १०० टक्के भरून देणे अशक्य आहे. परंतु महाराष्ट्रातील श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना म्हणून त्यांना मदत करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. तरी मुंबई व उपनगरातील गणेश मूर्तिकार आणि संघटनेतील मूर्तिकारांना ही विनंती करीत आहोत की पूरग्रस्त मूर्तिकार बांधवांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून गणेशमूर्तीच्या मदतीचा उपक्रम आपली संघटना राबवित आहे. आपण मूर्तिकार जरी पैशांनी सक्षम नसलो तरी मानाने नक्कीच सक्षम आहोत. ज्या पद्धतीने आपण गणपतीची मूर्ती घडवतो त्याप्रमाणे पूरग्रस्त मूर्तिकारांना पुन्हा उभारी देण्याचे काम आपल्याला करायचे आहे; तरी प्रत्येक मूर्तिकाराने खारीचा वाटा उचलावा.

- गणेशमूर्तीची उंची ही साधारणपणे १ ते २ फूट असावी.

- गणेशमूर्ती रंगवलेल्या स्वरूपात असाव्यात.

- गणेशमूर्ती शाडूमाती, लालमाती, कागदी (पेपर पल्प) स्वरूपाच्या असाव्यात.

- गणेशमूर्ती या प्लॅस्टिकच्या पिशवीने संपूर्ण झाकलेल्या असाव्यात.