मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने शुक्रवारी दाखल झालेल्या अनुयायींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.दरवर्षीप्रमाणे शांततेने रांगा लावून अभिवादनासाठी अनुयायी चैत्यभूमीवर गेले. चैत्यभूमी परिसरात ‘बुद्धं शरणं गच्छामि’ त्रिसरण पंचशीलची ध्वनीमुद्रीका वाजत होती. यावेळी डॉ. बाबासाहेबांचे विचार जाणून घेण्याच्या उद्देशाने अनुयायांकडून त्यांच्या पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. या अनुयायांमध्ये महिलावर्गाचाही मोठा सहभाग होता.मुंबई महापालिकेतर्फे अनुयायांना अनेक सुविधा पुरवण्यात आल्या. महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात बाबासाहेबांचे कार्य, त्यांची देशाविषयीची धोरणे, त्यांचा दूरदृष्टीपणा, आर्थिक व्यासंग, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांसंबंधित छायाचित्रे लावण्यात आली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनुयायींनी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेबांनी देशातील वंचितांचा उद्धार केला आहे. या छायाचित्र प्रदर्शनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार मांडण्याचा प्रयत्न महापालिकेने केला.
मुंबईत चैत्यभूमीवर उसळला भीम अनुयायांचा सागर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 3:24 AM