Join us

‘सी फेसिंग’ घरविक्रीला उधाण; मुंबईत गेल्या नऊ महिन्यांत ११ हजार ४०० कोटींच्या आलिशान घरांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 8:31 AM

मुंबईतला समुद्र प्रत्येकाला खुणावत असतो.

मुंबई : मुंबईतला समुद्र प्रत्येकाला खुणावत असतो. येथील चौपाट्या, मरीन ड्राइव्ह आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या उंचच उंच इमारती हाही प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय असताे. समुद्रालगतच्या उंच इमारतीत आपण घर घ्यावे, असे स्वप्नांचे इमलेही बांधले जातात. मात्र, काही जण आपले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात. गेल्या नऊ महिन्यांत मुंबईत ‘सी फेसिंग’ म्हणजेच दारं, खिडक्या या सगळ्यांची तोंडं समुद्राच्या दिशेने असलेल्या घरांच्या विक्रीला उधाण आले असून तब्बल ११ हजार ४०० कोटी रुपयांचा टप्पा या आलिशान घरांच्या विक्रीने ओलांडला आहे. खासगी कंपन्यांचे मालक, बॉलीवूडमधील कलाकार, मोठे बिझनेसमन यांनी प्रतिचौरस फुटांना दीड लाख रुपये असा घसघशीत दर मोजला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, यातील सर्वांत मोठा व्यवहार हा अलीकडेच दक्षिण मुंबईतील एका आलिशान इमारतीत झाला. या इमारतीत वित्तीय संस्थेमध्ये संचालक असलेल्या एका महिलेने २६३ कोटी रुपयांना तीन फ्लॅटची खरेदी केली आहे. यापैकी एक फ्लॅट २४ व्या, तर अन्य दोन फ्लॅट हे २५ व्या मजल्यावर आहेत. या फ्लॅटचे आकारमान तब्बल ९७१९ चौरस फूट आहे.

प्लास्टिक उद्योगातील एका उद्योगपतीने दक्षिण मुंबईतील एका आलिशान इमारतीत १६ ते २१ मजले १५४ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तर, अन्य एका उद्योजकाने दक्षिण मुंबईतीलच एका इमारतीमध्ये २९, ३० व ३१ अशा तीन मजल्यांची खरेदी २५२ कोटी ५० लाख रुपयांना केली आहे. या घरांचे आकारमान तब्बल १८ हजार चौरस फूट असून मुंबईतील सर्वांत आलिशान पेन्ट हाउस म्हणून या घराने लौकिक कमावला आहे.

सर्व खोल्यांतून समुद्र दिसेल अशा पद्धतीची रचना असलेल्या मलबार हिल परिसरातील एका इमारतीत एका उद्योजकाने तीन मजल्यांची खरेदी ३६९ कोटी रुपयांना केली आहे.

१० कोटी रुपयांवरील गृहविक्रीत वाढ

ज्या घरांची किंमत किमान १० कोटी रुपये आहे ती घरे व त्यावर किमती असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे. अशा घरांच्या विक्रीत एकूण ११ हजार ४०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.

दक्षिण मुंबईलाच पसंती

दक्षिण मुंबईतून मुंबईचा समुद्र सर्वांत देखणा दिसतो. त्यामुळे तिथल्या परिसरात १९६० च्या दशकांपासून बांधल्या गेलेल्या इमारतींनी समुद्राचे दृश्य हा आपल्या विक्रीचा प्राधान्य मुद्दा ठेवला होता. हेच आकर्षण आजही कायम आहे.

सर्वाधिक पसंतीची ठिकाणे

शेकडो कोटी रुपयांच्या आलिशान गृहविक्रीत दक्षिण मुंबईचा वाटा हा ४८ टक्के आहे, तर त्यानंतर उच्चभ्रू ग्राहकांनी वरळीला पसंती दिली आहे. तेथील विक्रीचा वाटा हा ३१ टक्के आहे. ११ टक्के वाटा वांद्रे परिसराचा आहे. तर, उर्वरित टक्केवारीत समुद्र दिसेल अशा मुंबईतील अन्य ठिकाणांचा समावेश आहे.