Join us

समुद्राने गिळली महामुंबईची १०७ चौ. कि.मी. जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

उपग्रहाच्या अभ्यासातून स्पष्ट : ३० वर्षांत पाणी पातळीत चिंताजनक वाढलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध कारणांनी नैसर्गिक जलप्रवाह ...

उपग्रहाच्या अभ्यासातून स्पष्ट : ३० वर्षांत पाणी पातळीत चिंताजनक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध कारणांनी नैसर्गिक जलप्रवाह बुजविल्याने, त्यात अडथळे आणल्याने, तसेच गेल्या ३० वर्षांत समुद्राच्या वाढत गेलेल्या पाणी पातळीने मुंबई महानगर परिसरातील १०७.६ चौरस किलोमीटर क्षेत्र नैसर्गिकरीत्या लुप्त झाल्याचा अहवाल समोर आला आहे.

सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलांमुळे लुप्त झालेले हे क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा थोडे अधिक आहे. त्याचे रूपांतर गाळयुक्त दलदल, कांदळवनात (खारफुटीत) झाले, असे सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्राथमिक अहवालातून पुढे आले. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील किनाऱ्यालगतच्या अनेक मोठ्या रहिवासी सोसायट्या पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला आहे. विशेषत: पावसाळ्यात हे संकट गहिरे होऊ शकते.

समुद्रकिनारे आत येत असल्याने किनारपट्टीवरील लाखो लोकांची उपजीविका धाेक्यात येऊ शकते, तसेच जमीन नापीक झाल्याचा फटकाही बसू शकतो.

मुंबई महानगर क्षेत्राच्या किनाऱ्यालगत वाढत असलेल्या पाणी पातळीचे चिंताजनक परिणाम उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासातून समोर आले आहेत. आजवर विविध अभ्यासकांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील समुद्राच्या पाण्याची पातळी २०३० पर्यंत वाढत जाणार असल्याची भाकिते वर्तविली आहेत. अलीकडच्या अभ्यासात उपग्रहाद्वारे गोळा केलेली गेल्या ३० वर्षांची (१९८९ ते २०१९ पर्यंत) माहिती एकत्रित करून अभ्यासली असता मुंबई महानगर आणि काेकण किनारपट्टीवरील समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेल्या चिंताजनक परिणामांची माहिती समोर आली आहे.

खाड्यांकडे लक्ष देणे गरजेचे

संकुचित होत चाललेल्या खाड्या हे शहरासाठी चांगले लक्षण नाही. यामुळे मुंबईत पावसाळ्यात पुरानंतर नाल्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत लक्षणीय घट होऊ शकते, असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. परिणामत: मोठ्या प्रमाणात पाऊस असताना आणि त्याचवेळी भरती आली तर हे समुद्राचे पाणी शहरामध्ये सर्व भागांमध्ये पसरते.

- डॉ. दीपक आपटे,

कार्यकारी संचालक, सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन

खारफुटींचे प्रमाण वाढले

खारे पाणी सखल भागात घुसत आहे. अशा ठिकाणच्या भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवने किंवा खारफुटी वनस्पती वाढीस लागल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे उरणमधील कारंजा भागात खारे पाणी जवळपास ६०.६ एवढ्या शेतीयोग्य भू क्षेत्रावर खाडीसारखे आत शिरल्याने या सर्व कृषी (भातशेती) भूमीवर खारफुटींचे प्रमाण सुमारे ४.५ पटीने वाढले आहे. सद्य:स्थितीत हे सर्व क्षेत्र कांदळवनात रूपांतरित झाले आहे.

मुंबई-ठाणे खाडीच्या जमिनीवर अंदाजे ४७ चौरस किलोमीटर नदी / नाल्यांचे क्षेत्र हे जमिनीमध्ये (खारफुटी / गाळयुक्त दलदलीने) रूपांतरित झाले आहे. याचप्रकारे ठाणे खाडीमध्ये २४ चौ. किलोमीटरचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हा सर्व परिणाम गाळयुक्त चिखल जमा झाल्याने, पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळात गोड्या पाण्यात झालेली घट आणि सतत वाढत असलेल्या समुद्र पातळीचा होत असलेला परिणाम यामुळे झाला आहे.