नाविकांसाठी बंदरात उभारणार ‘सीफेरर सेंटर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:22+5:302021-07-09T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रवासी नाविकांच्या सोयीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून बंदर परिसरात सीफेरर सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवासी नाविकांच्या सोयीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून बंदर परिसरात सीफेरर सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. नाविकांना याठिकाणी विरंगुळ्याबरोबरच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या कामासाठी ट्रस्टने इच्छुक कंपनीकडून अर्ज मागविले आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून हे सेंटर उभारले जाणार आहे.
परदेशातील बहुतांश मोठ्या बंदरात नाविकांना काही काळ थांबता अथवा विश्रांती करता यावी, याकरिता सीफेरर भवन उभारलेले असते. मुंबई पोर्ट हे ब्रिटीशकालीन बंदर आहे. मात्र, याठिकाणी नाविकांकरिता हक्काचे असे ठिकाण नव्हते. सीफेरर सेंटर उभारले जात असल्याने आता त्यांना विरंगुळ्यासाठी बंदरात येता येणार आहे. या सेंटरमध्ये रेस्तराँ, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकान, व्यायामशाळा, बिलार्ड टेबल, स्पा आणि सलून, कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.