लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात बुधवारी ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्याचा परिणाम सर्वच पक्ष कार्यालयांना भोगावा लागला. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी या राड्याची गंभीर दखल घेत शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्या कार्यालयांना रातोरात सील ठोकले. आयुक्तांच्या या कारवाईनंतर गुरुवारी विविध पक्ष कार्यालयांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.
मुंबई महापालिकेची नव्याने निवडणूक होईपर्यंत पालिका आयुक्त चहल यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांना पालिकेतील पक्ष कार्यालये वापरण्याची परवानगी दिली आहे. बुधवारी मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात शिंदे व उद्धव ठाकरे गटात जोरदार राडा झाला. एकमेकांविरोधात घोषणाबाजीही झाली.
प्रकरण आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करून दोन्ही गटांचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. राड्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा शिंदे व उद्धव गटात कार्यालय ताब्यात घेण्यासाठी वाद होण्याची शक्यता लक्षात घेता पालिका आयुक्तांनी सर्व पक्षांची कार्यालये सील करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
ठाकरे गटाचा आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या
ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर अडीच तास ठिय्या आंदोलन केले. त्यात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, मंगेश सातमकर, राजू पेडणेकर, तुकाराम पाटील, सचिन पडवळ यांचा समावेश होता. खा. विनायक राऊत यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. आयुक्तांनी त्यांची बाजू ऐकून घेतली परंतु कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.
मुख्यालयाबाहेर पोलिस
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून पुन्हा राडा होऊ नये, यासाठी पोलिस फौजफाटा पालिका मुख्यालयात व बाहेर तैनात करण्यात आला होता. फक्त पालिका कर्मचारी, अधिकारी व आयुक्तांना भेटण्यासाठी येणारे अभ्यंगत यांनाच पालिका मुख्यालयात सोडण्यात येत होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"