पाचपेक्षा अधिक रुग्ण बाधित असल्यास इमारत सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:11 AM2021-02-20T04:11:52+5:302021-02-20T04:11:52+5:30

नवीन हॉट स्पॉटवर महापालिकेचे लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या नव्या हॉटस्पॉटचे ...

Seal the building if more than five patients are infected | पाचपेक्षा अधिक रुग्ण बाधित असल्यास इमारत सील

पाचपेक्षा अधिक रुग्ण बाधित असल्यास इमारत सील

Next

नवीन हॉट स्पॉटवर महापालिकेचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या नव्या हॉटस्पॉटचे मॅपिंग करून तेथील जास्‍तीत जास्‍त चाचण्‍या केल्या जाणार आहेत. तसेच एका रुग्‍णामागे किमान १५ नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाच बाधित रुग्ण आढळून असल्यास आता संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

लोकल सेवा सुरू झाल्यापासून गेल्या दोन आठवड्यांत मुंबईतील काही भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर हे भाग पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बाधितरुग्ण आढळून आलेले ५७ चाळी - झोपडपट्टी आणि २५८ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. या हॉट स्पॉट विभागांमध्ये मिशन झिरोच्‍या धर्तीवर कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

* तर संपूर्ण इमारत सील

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने बाधित रुग्ण सापडलेला मजलाच सील करण्यात येत होता. मात्र पुन्हा इमारतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पाच रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गुरुवारी घेतला.

* अशी राबविणार मोहीम

- झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करून संशयितांची तपासणी केली जाणार आहे. तसेच मोबाइल व्‍हॅनच्या माध्‍यमातून रुग्‍ण शोधमोहीम सुरू ठेवून चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

- प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीमध्‍ये अतिजोखमीच्या व्‍यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र-१ आणि लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी केंद्र-२ असे प्रत्‍येकी किमान एक केंद्र सुरू ठेवणार.

- जम्‍बो सेंटर्समधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्‍णशय्या, ऑक्सिजन रुग्‍णशय्या उपलब्‍ध करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

-------------------

Web Title: Seal the building if more than five patients are infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.