मालाडमधील डी मार्ट महापालिकेकडून सील; कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:38 PM2021-07-24T20:38:47+5:302021-07-24T20:39:25+5:30
Mumbai : संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई - मालाड (पश्चिम) येथील लिंक रोडवर स्थित 'डी मार्ट' स्टोअरमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे उजेडात आले आहे. याची गंभीर दखल घेत पी/उत्तर विभाग कार्यालयाने शनिवारी या डी मार्टला सील केले आहे. तसेच संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला आहे. तरी अद्याप सावधगिरी म्हणून मुंबईमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध लागू आहेत. तरीही मालाडमधील लिंक रोड स्थित डी मार्ट स्टोअर मध्ये उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे पालिकेच्या पथकाला आढळून आले. डी मार्टच्या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बिल काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचे दिसून आले. कर्मचारी आणि ग्राहक वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचेही निदर्शनास आले.
एकाच वेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उपस्थिती नियमाचा देखील भंग केला. कोविड प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने हे डी मार्ट व्यावसायिक आस्थापना पुढील आदेशापर्यंत पालिकेने बंद केले आहे. तसेच डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियम भंग बाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.